किशोर भोईटे, सणसर
सणसर परिसरातील प्राचीन श्री महालक्ष्मी माता अर्थात ‘श्री पाहुणी आई’ मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या नव्या मंदिराचे उद्घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. मंदिराचे सुबक बांधकाम आणि प्रसन्न परिसर पाहून मंत्री तसेच उपस्थित भक्तगण अक्षरशः अचंबित झाले.
महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी स्वतःच्या प्रयत्नातून हे जीर्णोद्धार कार्य पूर्ण केले. चव्हाण कुटुंबीयांच्या शिवारात गेल्या २०० वर्षांहून अधिक काळापासून या देवस्थानाची सेवा सुरू आहे. पूर्वी भालचंद्र पांडुरंग निंबाळकर यांनी येथे छोटेखानी मंदिर उभारले होते. तसेच दीपक चव्हाण यांच्या मातोश्री विजया चव्हाण यांना आजारपणाच्या काळात देवीची प्रचिती आल्याने त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराची सूचना दिली होती. त्यातूनच या भव्य मंदिराचा उगम झाला.
दरम्यान उद्घाटनावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. तर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांनी मंदिरापासून मुख्य रस्त्यापर्यंत डांबरी रस्ता करण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व होमहवन विधी सौ. उत्कर्षा मोरे व सौरभ मोरे यांच्या हस्ते पार पडले. पूजाविधी किरण कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी व अशोक देशपांडे यांनी केले.
यावेळी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, संचालक रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, राज्य अन्न आयोगाचे सदस्य रणजीत निंबाळकर, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती हेमलता बडेकर, इंदापूरच्या पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे, सणसरचे सरपंच यशवंत नरूटे, सदर कार्यक्रम प्रसंगी पृथ्वीराज जाचक, जिल्हा परिषद सदस्य माधुरी भिसे, पंचायत समितीच्या सदस्या ज्योत्स्ना सुरूडकर आदींसह परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक चव्हाण यांनी केले तर आभार बाळासाहेब खरात यांनी मानले.











