सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : कोरोनाच्या नावाखाली सामान्य जनतेकडून दंड गोळा करण्याची आणि कोरोनाच्या नावाखाली साथ रोग प्रतिबंधक कायद्याचा आधार घेत व्यावसायिकांवर कारवाई करण्याची सरकारची खोड पुन्हा सुरू झाली आहे.. परवानग्यांच्या नावाखाली सामान्य लोकांचा मानसिक छळ करण्याची मागील वर्षातील परंपरा आता सुरू झाली आहे.. तेव्हा व्यवसायिकांनी जरा जपून! कारण इंदापूर तालुक्यात काल चार हॉटेल चालकांवर कारवाई झाली आहे!
इंदापूर तालुक्यातील काळेवाडी येथील हॉटेल त्रिमूर्ती हॉटेल चालक प्रतीक हनुमंत काळे; लोणी देवकर येथील हॉटेल माऊली हॉटेल चालक नवनाथ गोरख जाधव; लोणी देवकर येथीलच रॉयल टी सेंटर या चहाच्या दुकानचे मालक सोहम अण्णासाहेब दुरगुडे व लोणी देवकर शेजारील एमआयडीसी येथील हॉटेल रोकडे फुड हब या हॉटेलचे चालक अक्षय बाळासाहेब थोरात या चौघा जणांवर बिगर परवाना व निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल चालू ठेवल्याबद्दल साथरोग कायदा कलम 3,4 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 30, 33, 34, 41, 51 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी यासंदर्भात गस्ती चालू केले असून व्यवसायिकांनी देखील वेळा पाळाव्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून यासंदर्भात पोलिस शिपाई विनोद मोरे व अर्जुन सिंग यांनी फिर्याद दिली होती या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दीपक पालखी पोलीस नाईक प्रमोद अंबेकर व महिला पोलीस नाईक श्रीमती भोंगळे हे करीत आहेत.
दरम्यान कोरोना चा प्रभाव वाढत असून हॉटेल मालकांनी आपले हॉटेल निर्धारित वेळ चालू ठेवावे, अन्यथा सध्या सुरू असलेली कारवाई दररोज होणार आहे आणि ज्या हॉटेल मालकांवर दोन पेक्षा अधिक वेळा गुन्हे दाखल होतील, त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन खात्याला कळवले जाईल. त्यामुळे हॉटेल चालकांनी निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ हॉटेल चालू ठेवू नयेत असे आवाहन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले आहे.











