बारामती : महान्यूज लाईव्ह
कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून घरून राज्यातील विविध आरोग्य केंद्रे, पोलिस आयुक्तालये यांच्याशी संपर्क ठेवत तब्बल २० हजार लिटर सॅनिटायझरचे वितरण करण्यास सुरवात केली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, अमरावती, सोलापूरसह १६ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून सॅनिटायझरचे येथे वितरण केले जात आहे.
ससून, नायडू रुग्णालयासह पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरातही याचे वितरण करण्यात आले आहे. रोहित पवार हे राजकारणात येण्यापूर्वी अगदी सन २०१४ पासून वर्तमानकालीन समस्यांवर उपाययोजना शोधताना सुरवात स्वतःपासून करीत आहेत. अगदी मराठवाडयातील दुष्काळी कालावधीत तेथील मुलींचे शिक्षण बंद राहू नये यासाठी त्यांच्या भोजन व शिक्षणासाठी २५ लाख रुपयांचा निधी त्यांनी दिला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत ते सामाजिक बांधिलकी मानून आरोग्य, शिक्षण, बालविकास या घटकांसाठी काम करीत आहेत. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असतानाच सॅनिटायझरचा व मास्कचा तुटवडा असल्याची माहिती लक्षात घेऊन त्यांनी घरातूनच राज्यभरातील युवकांशी संपर्क व संवाद साधत उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या ‘वर्क फ्रॉम होम‘चे राज्यभरातुन कौतुक होत आहे.
आमदार रोहित पवार, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व बारामती अॅग्रो लिमिटेडच्या मदतीने राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधे २० हजार लिटरपेक्षा जास्त सॅनीटायझरचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील पोलिस यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच त्या भागातील जिल्हा रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे,आरोग्य उपकेंद्रे यांच्या वापरासाठी हे सनीटायझर पाठवण्यात येत आहे.
ससून व नायडूला ही मदत
याखेरीज पुण्यात ससून व नायडू संसर्गजन्य विकार उपचार रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाँक्टर, परिचारिका तसेच सर्व कर्मचाऱ्यांकरीता प्रतिबंधक चष्मेही वितरीत करण्यात आले आहेत.










