बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही महिन्यांपासून जर शनिवारी-रविवारी बारामतीत असायचे, मात्र कोरोनाच्या काळात त्यांचे जाहीर कार्यक्रम झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या आवारात त्यांना भेटण्यासाठी एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागतात. त्या सर्व नागरिकांना भेटून अजितदादा बारामतीची विकासकामे पाहतात हा आजवरचा अनुभव आहे, मात्र आता अजितदादांना उद्घाटनासाठी लोकांनी आग्रह धरला आहे. तसा त्याचा मागील आठवड्यात पहिला दिवस होता. त्या दिवशी एक-दोन उद्घाटने दादांनी केली, मात्र येत्या रविवारी दादांचे भरगच्च कार्यक्रम बारामतीत आहेत.
येत्या रविवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अजित दादा बिझी आहेत. यादरम्यान बारामती, माळेगाव, पणदरे, जळोची, देऊळगाव रसाळ आदी ठिकाणी अजितदादांचे नियोजित जवळपास तेरा कार्यक्रम आहेत. यामध्ये काही भूमिपूजन, काही उद्घाटन तर काही ठिकाणी विकास कामांची पाहणी असा भरगच्च कार्यक्रम आहे. यातूनही सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवला आहे.
मागील आठवड्यात ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अजित दादा ची भेट घेतली. तालुक्यात 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. 49 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीशी निगडित कार्यकर्ते निवडून आले, त्यांच्यासाठी अजितदादांनी वेळ दिला व त्यांचे कौतुक करुन त्यांना विकास कामासाठी मार्गदर्शन केले. आता गेल्या वर्षभरात झालेल्या अनेक गावातील विकासकामांची उद्घाटने खोळंबली आहेत. त्यामुळे या पुढील काळात प्रत्येक आठवड्यात बारामती तालुक्यातील विविध गावांमधील विविध विकास कामांचे उद्घाटन होतील अशी शक्यता आहे.











