महान्यूज : आजची गझल
कुणाची दृष्ट नव्हती ती कुणी ना भारले जगणे…
जराशी वाट चुकल्यावर खरे अंधारले जगणे…
*
नको शहरी दिखावा मज नको ती बंद घरदारे
बरा आहे इथे गावी इथे संचारले जगणे…
*
तळाचा गाळ काढावा झरा मग वाहतो खळखळ
तसे मन शेंदल्यावर मी पुन्हा आकारले जगणे…
*
भले मजल्यावरी मजले अताशा बांधते मुलगा
खरे तर मायबापांनी कितीदा मारले जगणे…
*
मनोरा उंच बांधाया जवळ तू धैर्य ठेवावे
जरासा डाव गडगडता असे का सारले जगणे…
*
गझलकार- अरविंद उन्हाळे, भोन, संग्रामपूर










