बारामती : महान्यूज लाईव्ह
एका सव्वा महिन्याच्या मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घडली आहे. दुपारी पाळण्यात झोपवलेल्या या चिमूरडीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील दिपाली संदीप झगडे ही विवाहित महिला बाळंतपणासाठी माळेगाव येथे आपल्या माहेरी आलेली होती. नेहमीप्रमाणे आज या विवाहितेने आपली मुलगी राधा हिला पाळण्यात झोपवले. मात्र झोपेतून उठल्यानंतर पाळण्यात मुलगी नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तर संबंधित विवाहितेचे आजोबा संदीप जाधव यांनी माळेगाव पोलिस दूरक्षेत्रात याबाबत माहिती दिली.
या दरम्यान, घराजवळ असलेल्या एका टाकीत राधा या चिमूरडीचा मृतदेह आढळून आला. या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत बारामती तालुका पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.











