दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वाखारी येथे 2018 ला जबरी चोरी करून फरार झालेल्या चोरास यवत पोलीसांनी सुमारे दोन वर्षानंतर सोलापुर येथील मंद्रुप येथून मोठ्या शिताफीने अटक केले.अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे यांनी दिली.
अभिजीत शिवाजी दांडेकर ( वय 20 , रा. मंद्रूप जि.सोलापूर) असे अटक केलेल्या अट्टल चोराचे नाव आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी परशुराम चंद्रशेखर मदने हा पुणे कडून सोलापुर दिशेकडे जात असताना पुणे सोलापूर महामार्गावरील वाखारी हद्दीत 26 ऑगस्ट2018 रोजी वाकडा पुल येथे आल्यावर महामार्गावरील ट्रकला पाठीमागून आलेल्या चॉकलेटी रंगाचा चार चाकी टेम्पोने ओव्हरटेक करून त्याचे टेम्पो समोर उभा करून त्या मधील अक्षय उकिरडे व इतर तीन अनोळखी चोरटे यांनी मदने यांना हाताने मारहाण केली. त्यांच्या जवळील रोख रक्कम , मोबाईल फोन. ट्रक मधील साऊंड, ड्रायव्हिंग लायसन असा एकूण 19 हजार 900 चा माल चोरी करून उकीरडे फरार झाला होता. याबाबत मदने यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. माराहण व चोरी केल्यापासून चोरटे पसार होते.
यातील अक्षय ज्ञानेश्वर उकिरडे यास 22 ऑगस्ट 2018 रोजी यवत पोलीसांनी अटक केले होते. तर उर्वरीत आरोपी दोन-तीन वर्षापासून फरार होते. आरोपींचा कोणताही धागेदारा मिळत नव्हता. फरार असलेल्या आरोपी अभिजीत शिवाजी दांडेकर हा सोलापुर जिल्ह्यातील मद्रुप येथे असल्याची माहिती यवत पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार पुणे जिल्हा ग्रामिण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपलिभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस नाईक दशरथ बनसोडे, पोलीस नाईक संतोष पंडित, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब चोरमले, हेमंत कुंजीर आदींनी यांनी मंद्रूप येथे जाऊन मंद्रूप पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पुंगीवाले यांचे मदतीने आरोपीचा कुठलाही धागादोरा नसताना आरोपीच्या गावी जाऊन सदर आरोपीला
बुधवारी ( दि. 25 ) मोठ्या शिताफीने अटक केले.
या आरोपीला दौंड न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यातील अटक केलेला आरोपी अभिजीत शिवाजी दांडेकर हा मागील दोन वर्षापासून फरार झाला होता. या गुन्ह्यांतील दोन आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले असून या गुन्हातील उर्वरीत फरार असलेल्या दोन आरोपींना ही लवकरच अटक करू, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक कापरे यांनी दिली. दरम्यान जबरी चोरी केल्याप्रकरणी आरोपीला यवत पोलीसांनी अटक केलेल्याने नागरीकांनी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यवत पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.










