वालचंदनगर : महान्यूज लाईव्ह
इतर अवैद्य दारू विक्री करायची, या दारू विक्रीतून आलेल्या पैशातून लोकांना त्रास द्यायचा, दहशत मागवायची आणि समाजस्वास्थ बिघडेल अशी कृत्ये करायची..हे यापुढे चालणार नाही.. वालचंदनगर पोलिसांनी एका संपूर्ण कुटुंबाला यासंदर्भात दणका देत तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.
इंदापूर तालुक्यातील काझड येथे अवैध दारू विक्री करून दहशत माजवणारी एका संपूर्ण कुटुंबाची टोळीच वालचंद नगर पोलिसांनी तडीपार केली आहे.
वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत काझड येथील ललिता कांतीलाल भारती या महिला टोळीप्रमुखासह तिच्या टोळीतील प्रदिप कांतीलाल भारती, संदिप कांतीलाल भारती, सोनल संदिप भारती व कांतीलाल बाळु भारती (सर्व रा. काझड ता. इंदापुर जि. पुणे) हे सर्वजणांनी आपली टोळी निर्माण करुन टोळीची दहशत निर्माण करण्याकरीता बेकायदेशीर अवैद्य दारु विक्री, राज्यात बंदी असलेला गुटखाविक्रीचा व्यवसाय, तसेच चोरुन दारु विक्री केली. तर त्यांच्या या प्रकाराबद्दल माहिती देणाऱ्या लोकांची ते बेकायदा जमाव जमवून मारहाण करायचे. अशा प्रकारे जनतेत दहशत निर्माण करणारे गंभीर गुन्हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
त्यांच्या टोळीच्या अवैद्य व्यवसायामुळे सामान्य लोकांचे संसार उध्वस्त होत असल्याने वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यामार्फत या टोळीला तडीपार करण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता.
हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा चौकशी अहवाल , गोपनीय साक्षीदार जबाब, अभिलेखावर असलेले गुन्हे या सर्वावरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 च्या कलम 55 प्रमाणे पुणे जिल्ह्यातील इंदापुर, बारामती, दौंड , पुरदंर या तालुक्यात 3 महिन्याकरीता हद्दपार केले.











