पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एका बाजूला भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेत असतानाच दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या नीता ढमाले यांनी थेट मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे. गुरुवारपासून (दि.१९) त्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
शुक्रवारी त्यांनी कराडमध्ये आपले राजकीय प्रेरणास्थान असणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम येथील समाधीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “लोकशाहीचे विकेंद्रीकरण हाच स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या राजकारणाचा पाया होता. राजकारणामध्ये सर्वच जातीधर्माच्या व्यक्तींना स्थान असावे, त्यात महिलांनाही संधी मिळावी या गोष्टी त्यांनी केवळ उक्तीतुन नाही तर कृतीतून अंमलात आणल्या. आपण कुठल्याही क्षेत्रात असलात तरी सर्वांना सोबत घेऊन चालायचे हा त्यांचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे. पदवीधरांच्या समस्यांना, त्यांच्या रोजगाराच्या प्रश्नांना भिडण्याची माझी तयारी आहे. स्व.चव्हाण साहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माझे लढण्याचे बळ द्विगुणित झाले आहे.”
१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. यादरम्यान पदवीधर मतदार मेळावे घेऊन त्या प्रत्यक्ष पदवीधरांच्या विविध समस्या त्या जाणून घेत आहेत. नीता ढमालेंच्या उमेदवारीमुळे भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनाही ही निवडणूक सोपी राहिली नाही हे दिसून येत आहे.










