महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
राज्यातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोरोनामुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता पूर्ण रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी याची माहिती आज दिली
राज्यातील 19 जिल्ह्यातील 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्याचे 30 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते, परंतु राज्यात कोरोनाची स्थिती उद्भवल्यानंतर छाननीच्या टप्प्यावर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्या वेळी एक जानेवारी 2019 च्या धर्तीवर निवडणूक मतदारांची यादी जाहीर करण्यात आली होती, परंतु आता राज्य निवडणूक आयोगाने एक जानेवारी 2020 या मुदतीवर नवीन अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली.
आता त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदवलेल्या मतदारांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढवता यावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी पाच फेब्रुवारी 2020 रोजी जो आदेश काढून मतदार यादी जाहीर केली होती, ती देखील रद्द केली आहे. त्यामुळे नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम सुरुवातीपासून जाहीर होणार आहे.











