महान्यूज : आजची गझल
कोरोनावर मात करूया,म्हणती सारे !
परंतु येता प्रसंग बाका , दडती सारे !
*
एक विषाणू इवलासा , पण दहशत मोठी ,
आला म्हणता , घाबरून मग पळती सारे !
*
ह्या व्याधीला नाही पर्वा कोणाचीही ,
मात्र तरीही बेपर्वाई करती सारे !
*
” मोठी राष्ट्रे , खेळी त्यांची “, कुणी म्हणाले ,
तिच्यामध्ये निरपराध मानव मरती सारे !
*
योद्धे सारे आपत्तीशी झुंजत असता ,
राजकारणी परस्परांशी लढती सारे !
*
औषध केवळ नसे पुरेसे कळल्यानंतर ,
योगसाधनेकडे शेवटी वळती सारे !
*
‘ अविनाश ‘ म्हणे , माणूस नसे हो लेचापेचा ,
त्याच्याशी जे लढती , अंती हरती सारे !
गझलकार- प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर, बाणेर , पुणे. भ्रमणध्वनी : ९८५०६१३६०२
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी-चिंचवड











