बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोना च्या काळात बारामतीतील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांवर हल्ल्याचा प्रकार घडला होता, या प्रकरणातील आरोपीने जामीन मागितला, मात्र उच्च न्यायालयाने डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन होऊ शकत नाही अशा शब्दात ताशेरे मारून आरोपीला एक लाख रुपयांचा दंड केला व हा दंड मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिले, ही रक्कम भरल्यानंतरच आरोपीला अटकपूर्व जामीन मिळणार आहे.
न्यायाधीश भारती डांगरे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. बारामती येथे आरोग्य हॉस्पिटलमध्ये बारामतीतील प्रतिष्ठित व्यापारी कोरोनाग्रस्त झाल्याने उपचार घेत होते, या दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बनली होती व यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथे आलेल्या जमावाने डॉक्टरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान शिवाजी जाधव या व्यक्तीने डॉक्टर सुजित अडसूळ या भूलतज्ञावर हल्ला केला. शिवीगाळ करून मारहाण केली, त्यांच्याबरोबरच दवाखान्यातील इतर कर्मचाऱ्यांकडे अश्लील हावभाव करून त्यांना शिवीगाळ केली. या प्रकरणावरून बारामती शहर पोलिसांनी शिवाजी जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
शिवाजी जाधव याने बारामतीच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला, मात्र तो फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. याची सुनावणी न्यायाधीश श्रीमती डांगरे यांच्यासमोर झाली.
यावेळी न्यायाधीशांनी कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी जे काम केले आहे, ते दीर्घकाळ योगदान देणारे आहे. मानवतेच्या दृष्टीने त्यांनी काम केले असताना त्यांच्यावरील हल्ल्याचे समर्थन होऊच शकत नाही अशा शब्दांत ताशेरे मारले व आरोपीला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला, परंतु एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीत दोन आठवड्यात भरण्याचे निर्देश दिले. ही रक्कम भरल्याखेरीज अटकपूर्व जामीन मंजूर केला जाणार नाही असेही निर्देश दिले, जर एक लाख रुपये भरले नाहीत तर आरोपींना अटकपूर्व जामिनाचा अधिकार राहणार नाही असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे डॉक्टरांना मोठे बळ मिळाले आहे असे मानण्यास हरकत नाही. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे बारामतीतील सर्व डॉक्टरांनी स्वागत केले आहे. या घटनेनंतर बारामतीतील सर्व डॉक्टर्स संघटना एकत्र आल्या होत्या. त्याचबरोबर बारामतीकरांनी देखील या घटनेच्या विरोधात संताप व्यक्त केला होता.










