महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
एक काळ असा होता ज्यावेळी दळणवळणाची आणि संपर्काची साधने नव्हती आणि राजकारणातला प्रेमाचा, अगत्याचा, कौतुकाचा एक भाग कार्यकर्त्यांच्या जिवात आणि नेत्यांच्याही उरात कायम असायचा.. अगदी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, एवढेच काय शरद पवार यांच्यापर्यंत बांधावरच्या शेतकर्याचा नेत्यावर लावलेला प्रचंड लळा सातत्याने अनुभवास येत असे. मागील काही वर्षापूर्वी दौंड तालुक्यात शरद पवारांची सभा झाली, सभा सुरू असताना अचानक शरद पवार यांनी एका व्यक्तीला बोलावून घेतले आणि विचारले, तू भिवा शेलार का?..या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार यांच्या कार्यकर्ता, मित्र, नेता या सर्व वाटचालीतील जो सामान्यपणा आहे, तो अनुभवास आला होता.. तसा अनुभव उपमुख्य मंत्री असलेल्या अजित पवार यांच्या बाबतीत बऱ्याचदा येतो.. अजितदादा यांनी अनेक नेते घडवले, कार्यकर्ते घडले, अनेक आमदार घडवले, मंत्री घडवले, पण त्याचबरोबर जनसामान्यांची नाळ मात्र कायम ठेवली, त्यामुळेच काल-परवा कोरोनाची लक्षणे दिसताच क्वारंटाईंन झालेले अजितदादा सामान्यांच्या दृष्टीने काळजातले दादा वाटले..
अजितदादांच्या मुंबईतील बंगल्यात फोन येतात, ते काही नवीन नाही. आमदार, मंत्री, अधिकारी, ज्यांची कामे आहेत ते, अशांचे तर फोन सारखी येतातच, पण गेल्या चार-पाच दिवसांपासून एकदम सामान्य लोकांचे फोन येतात आणि त्याची आवर्जून नोंद अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांनी ठेवली आहे.
सुनिलकुमार मुसळे यांनी लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्याचा उल्लेख आहे आणि तो लेख अजित पवार यांचा तळागाळातला संपर्क आणि तळागाळातल्या अजित पवार विषयी वाटणारे सामान्य लोकांना प्रेम याची अनुभूती देणारे आहे.
सुनिलकुमार मुसळे यांची पोस्ट जशीच्या तशी,
चार दिवसांपूर्वी अजितदादांची प्रकृती बिघडली अशा बातम्या आल्या. मला पहिला फोन आला, कोल्हापूरहून देवबाचा. देवबा हा काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही. एका संस्थेत काम करतो. पार्टीत नसला तरी दादांच्यावर खूप प्रेम करतो. दादांचा दौरा असला की देवबा असतोच, असतो पण कसा? तो एकदा दादांना दिसतो आणि पुन्हा दुरून कार्यक्रम बघतो. पुढं येत नाही. असा हा साधा दादाप्रेमी माणूस. देवबाने परवा फोन केला.
“दादांसनी कस हाय?”काळजीनं तो विचारत होता. मी पुन्हा पुन्हा सांगत होतो आणि हा पुन्हा पुन्हा विचारत होता. दादा ठीक आहेत यांची खात्री झाल्यावर त्यांनं फोन ठेवला..
चांगुणामावशी. पवार घराण्यावर प्रेम करणारी एक सामान्य कुटुंबातील माऊली. तिचा सकाळी सकाळी फोन,”आव सायेब दादा कुठं हायती? तब्बेत बरी न्हाई म्हणून टीव्हीवर बघितलं. म्हणून काळजी वाटतीया. काय झालय दादाला?”मावशी विचारू लागली. लेकराची काळजी करावी अशी मावशी विचारत होती. सुरात चिंता जाणवत होती..
कुठूनतरी असाच एक फोन येतो. नाव सांगत नाही, गाव सांगत नाही. थेट सुरुवात.”आव सायेब दादांना बर हाय का? काय झालं? काळजी घेत नाहिती कशी दादा?” एकावर एक अनेक प्रश्न..
दादांची प्रकृती बिघडल्यावर मोठ्या लोकांचे जसे फोन आले, तसेच कित्येक सामान्य, गरीबांचे फोन आले. याकाळात दादांच्याबद्दल सामान्य लोकांना वाटणारा जिव्हाळा लक्षात आला. दादांनी आजवर जे काही काम केलं आहे, ते अगदी तळागाळापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे राजकारणात नसलेली माणसंही दादांची काळजी करतात. बंगल्यातील लोक जशी काळजी करतात, तशी साध्या घरातील लोकही दादांची काळजी करतात. त्या दोन दिवसात मला दादांचा अभिमान वाटला आणि दादांच्यावर अफाट प्रेम करणाऱ्या जनतेला सलाम करावासा वाटला…!
Sunilkumar Musale










