अनेक वर्षांचे जुने वाद मिटल्याने पक्षकारांमध्ये समाधान; न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयाचे कौतुक
बारामती : न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब टाळून सामान्य नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष लोकअदालतीला यश मिळाले. तालुका विधी सेवा समिती, बारामती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) पार पडलेल्या या लोकअदालतीत तब्बल ४२ प्रलंबित खटले सामोपचाराने निकाली काढण्यात आले असून, त्याद्वारे १ कोटी ३० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधीश-१ श्री. व्ही. सी. बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात ६ वे सहायक दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रितेश सु. भंडारी यांनी पॅनेल प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. लोकअदालत यशस्वी व्हावी आणि अधिकाधिक नागरिकांना याचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
संसाराची विस्कटलेली घडी सावरली; पक्षकार भारावले
या लोकअदालतीचे सर्वात मोठे आणि कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेले जुने वाद सामोपचाराने मिटले. विशेष म्हणजे, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीच लोकअदालत भरवण्यात आल्याने, इतर न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकारांनाही या प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळाली. यातून प्रेरणा घेत काही वैवाहिक प्रकरणांतील जोडप्यांनी स्वतःहून पुढे येत आपली व्यथा मांडली आणि तडजोडीची विनंती केली. पॅनेल प्रमुख व सदस्यांनी त्यांना अत्यंत संवेदनशीलतेने आणि योग्य मार्गदर्शन केल्याने त्यांच्यातील कटुता कमी होण्यास मदत झाली.
सूक्ष्म नियोजन आणि उत्तम समन्वयाचे फलित
या नेत्रदीपक यशामागे न्यायालयीन यंत्रणेचे सूक्ष्म नियोजन कारणीभूत ठरले. लोकअदालतीपूर्वी तडजोडयोग्य प्रकरणांची यादी तयार करून संबंधित पक्षकार, वकील, बँका आणि वित्तीय संस्थांशी आधीच संपर्क साधण्यात आला होता. पूर्वसमुपदेशन आणि पूर्वतडजोड बैठका घेऊन नागरिकांना लोकअदालतीचे फायदे पटवून देण्यात आले. तसेच, बँका आणि वित्तीय संस्थांना एकरकमी तडजोड योजनेचा (OTS) लाभ देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. न्यायाधीश, पॅनेल सदस्य, विधिज्ञ आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्यातील समन्वयामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
श्री. व्ही. सी. बर्डे, जिल्हा न्यायाधीश-१, बारामती : लोकअदालतीच्या माध्यमातून वेळ आणि पैशांची बचत होऊन सामोपचाराने वाद मिटतात. आगामी राष्ट्रीय लोकअदालत येत्या १२ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्येही जास्तीत जास्त प्रलंबित खटले निकाली काढून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमचे प्रयत्न अविरत सुरू राहतील.”










