परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनिषा ओमासे यांच्या धडाकेबाज मोहिमेने गुन्हेगारांचे धाबे दणाणले; ६५ वॉरंट व ७० पाहिजे आरोपी येरवडा कारागृहात रवाना
बारामती: बारामती शहर परिसरात गुन्हे करून राजरोसपणे फिरणारे फरार गुन्हेगार आणि न्यायालयाच्या पकड वॉरंटला दाद न देणाऱ्या आरोपींविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक (प्रभारी अधिकारी) मनिषा ओमासे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राबवलेल्या विशेष ‘कोम्बिंग’ मोहिमेत तब्बल १३५ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. यामध्ये न्यायालयाच्या पकड वॉरंटमधील ६५, तर विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या (फरार) ७० आरोपींचा समावेश असून, या सर्वांची रवानगी थेट येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पोलिसांच्या या ‘सिंघम’ स्टाईल कारवाईमुळे बारामतीतील गुन्हेगारी विश्वाचे धाबे दणाणले आहेत.
भल्या पहाटे घरी जाऊन आरोपींची धरपकड
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांतील तब्बल २३० आरोपी दीर्घकाळापासून फरार होते आणि समाजात राजरोसपणे वावरत होते. प्रभारी अधिकारी मनिषा ओमासे यांनी या सर्व गुन्हेगारांची आणि वॉरंट असलेल्या आरोपींची संपूर्ण कुंडली तयार केली. गोपनीय माहिती संकलित करून आरोपी पकडण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली. आरोपी दिवसा हाती लागत नसल्याने पोलिसांनी रणनीती बदलत भल्या पहाटे त्यांच्या घरांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. झोपेत असलेल्या या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकत न्यायालयात हजर केले.
न्यायालयाकडूनही पोलिसांच्या कामाचे कौतुक
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचा मोठा परिणाम दिसून येत आहे. अटक होण्याच्या भीतीने आणि पोलिसांचा धसका घेतल्याने इतर वॉरंट असलेले आरोपी आता स्वतःहून न्यायालयात हजर होऊ लागले आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्याकडून पकड वॉरंट आणि समन्सची १०० टक्के बजावणी होत असल्याने प्रलंबित खटले निकाली निघण्यास मोठी मदत होत आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल खुद्द न्यायालयानेही पोलिसांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.
या पथकाने फत्ते केली कामगिरी
ही मोठी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनिषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार उदय टापरे, पोलीस शिपाई तुषार शिंदे, चालक ऋषीकेश जाधव, आरटीपीसी अक्षय कोळेकर आणि सरोदे यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली आहे.










