बारामती: दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी धुडकावून लावल्याने थेट बंगल्याच्या पार्किंगमधील चारचाकी गाडीवर गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या आठ तासांत छडा लावला आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधार बंड्या उर्फ अक्षय काळे याला अटक करण्यासाठी तपास पथक पाठवण्यात आली असून, दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना (अल्पवयीन मुले) ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २१ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नक्षत्र गार्डनच्या पाठीमागे असलेल्या शिवशंभो नगरमधील ‘अनन्या व्हिला’ येथे ही थरारक घटना घडली. फिर्यादी राजन धनंजय कोळेकर (वय ३५) यांच्याकडे बंड्या उर्फ अक्षय काळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. कोळेकर यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
आठ तासांत आरोपी जेरबंद
घटनेचे गांभीर्य ओळखून बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०८ (३), ३०८ (४), ३ (५) आणि भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच विशेष तपास पथके रवाना करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या आठ तासांत दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी मुख्य आरोपी बंड्या उर्फ अक्षय काळे याच्यासोबत मिळून हा गोळीबार केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत फरार मुख्य आरोपी बंड्या उर्फ अक्षय काळे याचा शोध घेऊन त्यालाही अटक करण्यासाठी तपास पथक पाठवण्यात आली आहेत.
या पथकाने केली कामगिरी
ही धडाकेबाज कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करत आहेत.










