बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील ग्रामीण आरोग्य सेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक प्रयोगशाळा तपासणी यंत्रे उपलब्ध होणार आहेत. पुणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या १३० यंत्रांचे आज पुणे जिल्हा परिषदेत वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे यांनी ही माहिती दिली.
होळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील जनआरोग्य समितीच्या बैठकीत रक्त तपासणीसाठी आधुनिक मशीनची आवश्यकता मांडण्यात आली होती. यावेळी समितीचे अध्यक्ष करण खलाटे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधत मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुसऱ्याच दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी १३० मशीन उपलब्ध करून दिल्या. यावेळी जनआरोग्य समितीचे सदस्य तथा पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप, आशाताई वायाळ, जितेंद्र पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. राजगे उपस्थित होते.
दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली हुलावळे आणि सभागृह नेते श्रीमंत ढोले, जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे यांच्या उपस्थितीत या यंत्रांचे वितरण करण्यात आले. या यंत्रांमध्ये बायोकेमिस्ट्री ॲनालायझर आणि थ्री-पार्ट हेमॅटोलॉजी ॲनालायझर यांचा समावेश आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रक्त तपासणीसह विविध प्रयोगशाळा तपासणी सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. ग्रामीण रुग्णांना स्थानिक स्तरावरच तपासणी सुविधा उपलब्ध होऊन वेळेत निदान आणि उपचारांचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. होळ येथील जनआरोग्य समितीच्या बैठकीतून मांडलेल्या मागणीला जिल्हास्तरावर मिळालेला प्रतिसाद आता बारामती तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधांमध्ये भर घालणारा ठरणार आहे.










