दौलतराव पिसाळ, वाई, सातारा
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत बाजी मारली आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, महायुतीमधील अंतर्गत राजकीय समीकरणे नव्याने समोर आली आहेत.
अशी ठरली राजकीय रणनीती
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने अवघ्या एका मताच्या फरकाने सत्ता स्थापन केली होती. त्या निवडणुकीदरम्यान झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा बँक निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नवी राजकीय मोर्चेबांधणी केल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
बुधवारी सकाळी एका बाजूला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी भाजपच्या संचालकांची बैठक पार पडली, तर दुसरीकडे मंत्री मकरंद पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येत आपली रणनीती निश्चित केली. ठरलेल्या सूत्रानुसार उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी अध्यक्षपदासाठी, तर दीपक चव्हाण यांनी उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. विरोधी गटाकडून अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
सहकार क्षेत्रातील अनुभवी चेहऱ्यांना संधी
उदयसिंह पाटील-उंडाळकर: दिवंगत नेते विलासकाका उंडाळकर यांचा वारसा पुढे चालवणारे कराड उत्तरचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याकडे आता जिल्हा बँकेचे नेतृत्व आले आहे. ते जिल्हा परिषद सदस्य असून रयत सहकारी साखर कारखाना आणि कोयना सहकारी बँकेचेही नेतृत्व करतात. दीपक चव्हाण: फलटणचे माजी आमदार आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना पुन्हा एकदा महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपली पकड मजबूत केली असून, आगामी स्थानिक राजकारणावर याचे महत्त्वाचे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










