राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही वायफळ खर्च न करता ‘आमदार राहुल दादा कुल मित्र मंडळ’ आणि तालुक्यातील नागरिकांच्या वतीने दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी तब्बल ४९ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. या देणगीचा धनादेश आमदार राहुल कुल यांनी नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
आमदार कुल यांच्या वाढदिवसानिमित्त उत्सवी खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला दौंड तालुक्यातील कार्यकर्ते, समर्थक, नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी राबवण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांतून हा ४९ लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला.
हा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ अंतर्गत दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी वापरला जाणार असल्याचे आमदार कुल यांनी सांगितले. दुष्काळजन्य परिस्थितीत तालुक्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल आणि दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आमदार राहुल कुल यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.










