आठ गुन्ह्यांची उकल, २.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांना मदत करणाऱ्या ग्रामस्थांचा विशेष सत्कार
शिक्रापूर (प्रतिनिधी) : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेतशिवारातील विद्युत रोहित्र (डीपी) खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारा लंपास करणाऱ्या संगमनेर येथील पाच जणांच्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल आठ गुन्ह्यांची उकल करत आरोपींकडून २ लाख २९ हजार ५०० रुपये किमतीच्या १७० किलो तांब्याच्या तारा हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, या मोहिमेत पोलिसांना मोलाची साथ देणाऱ्या उरळगाव येथील सहा ग्रामस्थांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार करण्यात आला.
दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्याचे हवालदार किरण ढुके व अंमलदार लहानु बांगर हे अरणगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी अरणगाव व उरळगावच्या शिवेवर विद्युत रोहित्र चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती त्यांना स्थानिकांकडून मिळाली. पोलिसांनी तातडीने परिसरात नाकाबंदी व शोधमोहीम सुरू केली असता, विनानंबर प्लेटच्या पल्सर दुचाकीवरून जाणारे दोघे संशयित आढळून आले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अडविल्यानंतर, दोघांनी दुचाकी जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत उसाच्या शेतात धूम ठोकली.
पोलिसांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेतात रात्रभर शोधमोहीम राबवून सकाळी दोघांना ताब्यात घेतले. प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २७) व सुनील पोपट केदार (वय २५, दोघे रा. नांदूर, खंदारमळा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस कोठडीत केलेल्या सखोल चौकशीत या दोघांनी आपल्या अन्य तीन साथीदारांची नावे उघड केली.
त्यानुसार पोलिसांनी दोन पथके रवाना करून संदीप यशवंत काळे (वय २३), निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ (वय २१, दोघे रा. नांदूर, खंदारमळा, ता. संगमनेर) आणि राजेंद्र सोमनाथ वर्पे (वय ३२, रा. वरवंडी, थापलीवस्ती खंडोबा, ता. संगमनेर) यांना बेड्या ठोकल्या. पाचही आरोपींनी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणी विद्युत रोहित्र पाडून तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख २९ हजार ५०० रुपये किमतीच्या १७० किलो तांब्याच्या तारा जप्त केल्या आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहाय्यक फौजदार लहानु बांगर, हवालदार किरण ढुके, रोहिदास पास्त्रे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, अंमलदार भारत भोसले, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे व योगेश भंडारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास किरण ढुके व भारत भोसले करत आहेत.
चौकट : नागरिकांच्या सतर्कतेला पोलिसांची सलामी
डीपी चोरांना उसाच्या शेतातून पकडून देण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत करणाऱ्या उरळगाव येथील संतोष सात्रस, विनायक सात्रस, लहू हुजगे, निलेश सात्रस, काळुराम चोरमले व संजय चोरमले या सहा सतर्क नागरिकांचा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून गुन्हेगारांना पकडण्यात मदत करणाऱ्या ग्रामस्थांच्या धाडसाचे यादव यांनी विशेष कौतुक केले.










