मुंबई : महान्यूज लाईव्ह
गेल्या अनेक दिवसापासून मफलर वाला नेता कोण? याची चर्चा सुरू होती. आज आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घेतले. अजितदादांच्या विमान अपघातातील आरोपींना अर्थात पीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग आणि व्ही. के. सिंग यांना आतापर्यंत वाचवण्यात देवेंद्र फडणवीसच पुढे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आज आमदार रोहित पवार यांनी दीड तासाची पत्रकार परिषद घेत यामध्ये अनेक बारकावे व अनेक माहिती अभ्यासपूर्ण मांडत हा आरोप केला. जर अजितदादांशी खरीच मैत्री होती, तर अजूनही यातील तपास परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा अशा स्वरूपाचे आवाहन रोहित पवार यांनी केले. दरम्यान रोहित पवार यांनी असाही आरोप केला की राज्याची सीआयडी ही महान संस्था असली तरी सध्या कुलूप लावायच्या लायकीची झाली आहे.
आम्ही ज्या ज्या वेळी एफ आय आर करायचा प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला टाळले गेले. एवढेच नाही तर सातत्याने वरून फोन यायचे. हा फोन सत्ताधाऱ्यांकडूनच यायचा. सत्ता अमृत नाही. सत्ता येते आणि जाते, मला माहित आहे, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर माझ्यावरती ईडी, सीबीआय आणि अन्य कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकते. पण मी कॉम्प्रमाईज करणार नाही. कालही केले नव्हते. आजही करणार नाही. व्ही. के सिंग आणि रोहित सिंगवर तातडीने कारवाई करावी.
मी कुठेच कॉम्प्रमाईज केले नाही, म्हणूनच अमेरिकेपासून ते जगभरातील अनेक देशातून आम्हाला माहिती मिळाली. अमेरिकेतल्या उच्चस्तरीय तपास संस्थांनी देखील आम्हाला माहिती दिली. जेवढे आम्हाला शक्य आहे तेवढे समोर आणले आहे. आम्ही यापुढेही आणत राहू. दादांवर प्रेम करणाऱ्या अनेकांनी आम्हाला मदत केली आणि माहिती मिळत गेली. अनेक डॉट्स जोडत गेलो आणि डॉट्स जोडून तयार झालेले चित्र मी मांडले आहे. आता सुनेत्रा काकी, पार्थ पवार, जय पवार यांनीही यामध्ये विचार करावा.










