राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड नगर परिषद आरोग्य विभागाची नवीन सक्शन कम जेटिंग मशीन मागील सहा महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली मशीन वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर पडून असल्याने नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असून स्वच्छतेअभावी नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या संदर्भात नगरसेविका स्वाती सावंत यांनी दौंड नगर परिषदेला निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. नगर परिषदेने तातडीने पावले उचलून हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली. दौंड नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासाठी शहरातील सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन मोकळ्या करणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या ड्रेनेजच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी नवीन सक्शन कम जेटिंग मशीन लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आली आहे.
मात्र, नागरिकांच्या सुविधेसाठी खरेदी करण्यात आलेली ही मशीन सध्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट परिसरात धूळखात का पडून आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील ड्रेनेज लाईन तुंबणे, सांडपाण्याचा निचरा न होणे, अस्वच्छता आणि दुर्गंधी अशा समस्या वारंवार निर्माण होत असताना ही अत्याधुनिक मशीन प्रत्यक्ष कामासाठी वापरात का आणली जात नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
नगर परिषदेने नागरिकांच्या कररुपाने जमा होणाऱ्या पैशातून लाखो रुपये खर्च करून मशीन खरेदी केली असेल, तर तिचा उपयोग शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने होणे अपेक्षित आहे. मात्र, मशीन वापराविना पडून असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या मशीनसाठी चालक, ऑपरेटर तसेच आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार तरी कधी? मशीनच्या वापराबाबत नियोजन ६ महिने उलटून गेले तरी का करण्यात आले नाही? तसेच मशीन कार्यान्वित न होण्यामागील नेमकी कारणे काय आहेत? असे आक्रमक प्रश्न नगरसेविका सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
माझ्या प्रभागात ड्रेनेजमुळे लोकांच्या घरात पाणी जात आहे. सक्शन जेटिंग मशीन सुरू नसल्याने आणि ओपन गटार असल्याने पाणी नागरिकांच्या घरात जात आहे, अशी व्यथा नगरसेविका स्वाती सावंत यांनी मांडली. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी व आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मशीनची प्रत्यक्ष पाहणी करावी, ती त्वरित कार्यान्वित करावी आणि शहरातील ड्रेनेज स्वच्छतेसाठी तिचा नियमित वापर सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली.
जनतेच्या पैशातून खरेदी केलेली यंत्रसामग्री धूळखात पडण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी वापरण्यासाठी आहे. याबाबत नगर प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी आक्रमक मागणी सावंत यांनी करत लक्ष वेधले आहे. यासंदर्भात नगरसेविका स्वाती सावंत यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.










