मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या (मर्जर) चर्चांना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील २० ते २२ आमदार पक्षाबाहेर पडण्याच्या मानसिकतेत असून ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून पक्षाच्या सर्व आमदारांना संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांना फोन करून सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली जात आहे. या संवादात प्रामुख्याने तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले जात असल्याचे समजते: दोन्ही राष्ट्रवादी गटांचे विलीनीकरण करणे योग्य ठरेल का? शरद पवार गटाकडून खरोखरच संपर्क साधण्यात आला आहे का? आणि पक्षातील सद्यस्थितीबाबत आमदारांचे नेमके मत काय आहे? राऊतांच्या दाव्यानंतर पक्षातील आमदारांची चाचपणी करण्यासाठी ही फोनाफोनी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संजय राऊत नेमके काय म्हणाले होते?
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटावर तीव्र टीका केली होती. “सुनेत्रा पवार यांचा म्हणजेच अमित शाह यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यातील २०-२२ आमदार कधीही बाहेर पडतील, कारण ते सध्या त्याच मानसिकतेत आहेत. हे आमदार शरद पवार यांना भेटत आहेत, ते केवळ गप्पा मारण्यासाठी नाही. तिथे अजित पवारांचे नेतृत्व राहिलेले नसून त्यांना स्वाभिमान गहाण ठेवून गुलामी करावी लागत आहे,” असा आरोप राऊत यांनी केला होता. तसेच, हे आमदार परत स्वगृही परतले तर त्याला विलीनीकरण म्हणता येणार नाही, किंवा ते इतर एक-दोन पक्षांतही प्रवेश करू शकतात, असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार यांचा पक्ष आणि शिंदे गट हे भाजपची ‘अंगवस्त्रे’ असल्याची टीका केली होती.
एकूणच, राऊत यांच्या या विधानानंतर अजित पवार गटाकडून आमदारांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. या संवाद मोहिमेतून आमदारांच्या मनातील नेमका कल काय आहे हे स्पष्ट होणार असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात कोणती नवीन दिशा पाहायला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











