अजितदादांची विकासाची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार; पाणी व चाऱ्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही
बारामती : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी भाऊबीजेच्या दिवशी बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. मुर्टी येथील सोनकरवस्तीला भेट देऊन त्यांनी शेतकरी कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ आणि झुणका-भाकरीचा आस्वाद घेत भाऊबीज साजरी केली. सणाच्या दिवशी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि घरी पोहोचून त्यांच्या व्यथा जाणून घेत, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
या भेटीदरम्यान पिण्याचे पाणी, शेतीचे सिंचन आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता यावर सविस्तर चर्चा झाली. सोनकरवस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी दिवसातून तीन वेळा टँकर सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले असून, आगामी काळात चारा टंचाई भासू नये म्हणून शेतकऱ्यांनी मोफत मिळणाऱ्या शासकीय बियाण्यांचा वापर करून जास्तीत जास्त क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
शासकीय मदतीचा आढावा आणि पाणीप्रश्नावर आश्वासन
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त जाहीर झालेली ५ हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाली का, याची आस्थेने चौकशी केली. यावर शेतकऱ्यांनी अग्रीम मदतीसोबतच कर्जमाफी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळाल्याचे सांगितले. तसेच, सुपे सात गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून या परिसरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. अजितदादांनी पाहिलेली बारामतीच्या विकासाची स्वप्ने आपण सर्वजण मिळून पूर्ण करू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जोगवाडी, अंबी येथे पाहणी व अधिकाऱ्यांना निर्देश
सोनकरवस्तीवरील भेटीनंतर सुनेत्रा पवार यांनी जोगवाडी येथे शिवाराची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर अंबी येथे शेतकरी कुटुंबाची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी अंबी फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी केल्यानंतर, त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या दौऱ्यादरम्यान ग्रामीण भागातील युवा स्केटिंगपटू शिवम नलावडे याने इंडोनेशिया आणि देहराडून येथील स्पर्धांमध्ये मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्याचे विशेष कौतुक करून गौरव केला.










