राजेंद्र झेंडे: महान्यूज लाईव्ह
दौंड : कपाळावरचा उपेक्षेचा आणि गुन्हेगारीचा शिक्का पुसून टाकत, जिद्द आणि आत्मसन्मानाच्या जोरावर प्रगतीची नवी पहाट कशी फुलवता येते, याचा आदर्श पाटस येथील संतोष शिंदे यांनी घालून दिला आहे. आदिवासी फासे पारधी समाजातील संतोष शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘वाघजाई ॲग्रो’ या कृषी खते व औषधांच्या दुकानाचा उद्घाटन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. पारधी समाजातील तरुणाने घेतलेली ही व्यावसायिक झेप संपूर्ण समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे.
दौंड तालुक्यासह राज्यभरात अनेक वर्षे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेला पारधी समाज आता शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या जोरावर स्वतःची नवी ओळख निर्माण करत आहे. संतोष शिंदे यांनी सुरू केलेले ‘वाघजाई ॲग्रो’ हे कृषी केंद्र केवळ एक दुकान नसून, पारधी समाजाच्या स्वावलंबनाचे आणि नव्या युगाचे प्रतीक मानले जात आहे. या उद्घाटन सोहळ्याला दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, ज्येष्ठ आदिवासी सेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्यासह स्थानिक शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार रमेश थोरात यांनी शिंदे कुटुंबाच्या संघर्षाची आठवण काढली. ते म्हणाले, आदिवासी सेवक नामदेव भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आज संतोष शिंदे यांच्यासारखे तरुण स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. संतोष यांचे आई-वडील कै. शेखान आणि हरुबाई शिंदे यांच्या संघर्षाचे साक्षीदार आम्ही राहिलो आहोत. आज आपल्या मुलाला उद्योजक म्हणून पाहताना त्यांना आभाळाइतका आनंद झाला असता. संकटांवर मात करत आदिवासी तरुण व्यवसायाकडे वळत आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असून अशा उपक्रमांच्या पाठीशी समाज कायम खंबीरपणे उभा राहील.
शेतकऱ्यांना मिळणार एकाच छताखाली सेवा
‘वाघजाई ॲग्रो’च्या माध्यमातून पाटस व परिसरातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाची रासायनिक खते, दर्जेदार बियाणे आणि शेतीविषयक औषधे एकाच छताखाली रास्त दरात उपलब्ध होणार आहेत. एका वंचित समाजातील तरुणाने थेट कृषी सेवा क्षेत्रात पदार्पण करून शेतकऱ्यांची सेवा करण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकाचा विषय ठरला आहे.
तरुणांसाठी दिशादर्शक पाऊल
सामाजिक पाठबळ, योग्य दिशा आणि अपार मेहनत यांच्या बळावर परिस्थिती बदलता येते, हे संतोष शिंदे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. पारधी समाजातील इतर सुशिक्षित तरुणांनीही नोकरीच्या मागे न धावता उद्योजकतेची कास धरावी आणि स्वाभिमानाने जगावे, यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. संतोष शिंदे यांच्या या धाडसी व कौतुकास्पद वाटचालीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










