नाशिक येथील राज्यस्तरीय स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे करणार प्रतिनिधित्व
बारामती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ आंतरविद्यापीठ युवक महोत्सवासाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर संचलित डॉ. शरदचंद्र पवार कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या तब्बल १० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे येत्या १८ ते २३ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात हे विद्यार्थी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ५ नोव्हेंबर रोजी या महोत्सवासाठी विद्यापीठस्तरीय निवड चाचणी पार पडली. विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप आवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत एकूण २८ विविध कला व क्रीडा-सांस्कृतिक प्रकारांसाठी ही चाचणी घेण्यात आली. यामध्ये डॉ. शरदचंद्र पवार कृषी आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याने परीक्षकांची मने जिंकली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रंगमंचीय, नाट्यकला आणि नृत्य विभागातून जिग्नेश पाटील, फाल्गुनी राठोड, तुषार करे, अनुजा मदने यांचा समावेश आहे. संगीत आणि वाद्यवृंद विभागासाठी सुदर्शन यादव, माधव पवार, नरेंद्र जावळे यांची, तर ललित कला विभागासाठी प्रांजल आहेर, अंकिता मारकड आणि स्वराज कांबळे यांची निवड झाली आहे.
तसेच, ललित कला विभागातून ओम पाटे, अनुराग काणे आणि वेदांती पानसरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला; तर आकांक्षा गवळी, धनश्री डोळे, अमरीन शेख, साक्षी लोणकर, साजिरी देवकाते, श्रेया भांगे, मृण्मयी हिंगने आणि हुजेफा भोरी या विद्यार्थ्यांनीही चाचणीत दर्जेदार सादरीकरण केले.
जिग्नेश पाटीलची सलग दुसऱ्या वर्षी निवड
महाविद्यालयाचा गुणी कलाकार जिग्नेश राजेंद्र पाटील याने मागील वर्षी जळगाव येथे पार पडलेल्या ‘इंद्रधनुष्य’ महोत्सवात ‘माईम’ (मूकनाट्य) या प्रकारात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून विद्यापीठाचा नावलौकिक वाढवला होता. यंदाही त्याने संघात स्थान पटकावले असून, त्याच्यासह संपूर्ण चमूकडून नाशिक येथेही पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक व टीम मॅनेजर म्हणून प्रा. आर. एम. बेलदार आणि प्रा. पी. जी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार, संस्थेचे समन्वयक प्रा. आशिष रासकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. गोंडे, उपप्राचार्य प्रा. एस. गायकवाड, तसेच एबीएमचे प्राचार्य ए. डी. भोईटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत नाशिक येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.










