मुंबई/पुणे : देशाच्या राजकीय वर्तुळात सध्या एका फोन कॉलची जोरदार चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. मात्र, या संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना केलेल्या एका विधानामुळे आता राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या,’ असे शब्दांत मोदींनी पवारांना आश्वस्त केल्याचा दावा केला जात आहे. या एकाच विधानामुळे राजकीय वर्तुळात आता तर्क-वितर्कांना उधाण आले असून, या कॉलचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि जुने सहकारी विठ्ठल मणियार यांनी माध्यमांशी बोलताना या फोन कॉलमागील रंजक माहिती दिली.
…आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही ठणठणीत राहा!’
विठ्ठल मणियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत आपुलकीने आणि आदराने शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी केली. या संवादादरम्यान मोदी पवारांना म्हणाले, “तुम्ही आतापर्यंत देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे, अहोरात्र काम केले आहे. आता सुप्रियाताई (खासदार सुप्रिया सुळे) देखील संसदेत आणि देशात खूप उत्तम काम करत आहेत.
त्यामुळे आता तुम्ही स्वतःच्या तब्येतीला प्राधान्य द्या आणि पूर्ण आराम करा. सुप्रियाताई आणि आम्ही सगळे मिळून देश सांभाळू. आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही फक्त ठणठणीत राहा. पंतप्रधान मोदींच्या या विधानावर राजकीय वर्तुळात आता मोठी चर्चा सुरू झाली असून, यातून भविष्यातील नव्या समीकरणांचे संकेत तर मिळत नाहीत ना? अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
पवारांचे मोदींना उत्तर
पंतप्रधानांच्या या आपुलकीच्या फोनवर शरद पवारांनीही त्यांना मनमोकळा प्रतिसाद दिला. माझी तब्येत आता बरी आहे. तुम्ही सर्वजण सोबत आहात, त्यामुळे मला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. मी माझ्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेत आहे, असे उत्तर शरद पवारांनी मोदींना दिल्याचे मणियार यांनी सांगितले.
पवारांना डिस्चार्ज; मुंबईत विश्रांती
छातीत कफ आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्याने शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून, बुधवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते बारामतीला न जाता थेट मुंबईतील त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी रवाना झाले आहेत. डॉक्टरांनी त्यांना पुढील किमान आठ दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
राजकीय तर्क-वितर्क आणि चर्चांना उधाण
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यातील कौटुंबिक व राजकीय स्नेह संपूर्ण देशाला ठाऊक आहे. मात्र, राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन मोदींनी पवारांना केलेला हा फोन आणि त्यात थेट ‘सुप्रिया सुळे’ यांच्या कर्तृत्वाचा केलेला उल्लेख सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या संवादाचे काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विश्रांतीनंतर दिवाळी संपताच शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून, ते दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.










