किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
कोणता चालक कधी काय विक्रम करेल याचा नेम नाही. छत्रपती कारखान्याला ऊस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर ड्रायव्हर बापू अनंत बोडरे यांनी आज एकाच खेपेत तब्बल 46 टन ऊस वाहतूक करत सुरक्षितपणे छत्रपती कारखान्यावर आणला. त्या चालकाचा कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
माळशिरस तालुक्यातील कोळेगाव येथील शेतकरी उमेश मगर यांचा आडसाली 86032 या जातीच्या उसाची तोड करून ट्रॅक्टर वाहतूकदार अजय सावंत यांच्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रेलरद्वारे हा ऊस श्री छत्रपती कारखान्यात आणण्यात आला. शेतकरी मगर यांच्या शेतापासून भवानीनगरपर्यंत साधारण 90 किलोमीटर अंतर आहे.
हे अंतर सुरक्षित पार करून संपूर्ण उसाचे वाहनासह 55 टन वजन घेऊन कारखान्याच्या वजन काट्यावर दाखल झाला. रिकाम्या वाहनाचे वजन व बाईंडिंग मटेरियल वजा जाता 45 टन 708 किलो निव्वळ उसाचे वजन भरले. एका ट्रॅक्टरमध्ये वाहतूकदाराने एवढा ऊस आणल्याने भवानीनगरसह इंदापूर तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला. कुतूहलापोटी कारखान्याच्या केन यार्ड मधील सर्व ड्रायव्हर यांनी हा ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पाहण्यासाठी गर्दी केली होती.
अर्थातच कायदेशीर दृष्ट्या एवढे वजन अतिरिक्त आहे, मात्र पोटाच्या पुढे बऱ्याच गोष्टी आता अलीकडे गौण ठरू लागल्या आहेत. आर्थिक अडचणी आणि आर्थिक स्वहित या सर्व गोष्टी अशा स्वरूपाच्या विक्रमाची नोंद करीत असतात. जेवढा जास्त ऊस वाहून आणता येईल तेवढे जास्त पैसे मिळतील हा एकच हेतू त्यापुढे असतो. त्यामुळे याकडे पाहताना मोठ्या पाण्याचा प्रश्न म्हणूनच पहावे अशी अपेक्षा देखील ऊस वाहतूकदारांनी केली.










