चालू वर्षी सहकारी संस्थांना १ लाख ५० हजार कोटींच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट; ५ वर्षांत ४ लाख कोटींपर्यंत नेणार
देशातील साखर उद्योगाला ४० हजार कोटींचा कर्जपुरवठा; महाराष्ट्राला ४ हजार कोटींचा निधी — हर्षवर्धन पाटील
डॉ. संदेश शहा, इंदापूर
राष्ट्रीय सहकारी विकास निगमने (एनसीडीसी) आगामी २५ वर्षांतील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सर्वंकष ‘रोड मॅप’ येत्या दोन महिन्यांत तयार करावा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. देशाच्या राजधानीत एनसीडीसी मुख्यालयात आयोजित ९३ व्या महापरिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या बैठकीत एनसीडीसीचे संचालक तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवत साखर उद्योग व सहकार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे मांडले. अध्यक्षीय भाषणात अमित शाह म्हणाले, भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये एनसीडीसी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी २५ वर्षांच्या संभाव्य रोड मॅपमध्ये संस्थात्मक रचना, संसाधन व्यवस्थापन आणि आधुनिक कामकाजातील बदलांचा प्रामुख्याने समावेश असावा. ईशान्य भारतातील कामाचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, “२०१३ पासून तेथील पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी राबवलेल्या विशेष सहकारी प्रकल्पांमुळे उत्पन्नात सुमारे ३३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली असून, जवळपास ८ लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत.”
हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीनंतर दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सहकारी संस्थांना चालू वर्षात १ लाख ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच पुढील ५ वर्षांमध्ये हा कर्जपुरवठा तब्बल ४ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे दीर्घकालीन नियोजन या बैठकीत निश्चित करण्यात आले.
देशातील साखर उद्योगाला ४० हजार कोटींचा कर्जपुरवठा
देशातील साखर उद्योगाला एनसीडीसीच्या माध्यमातून ४० हजार कोटी रुपयांचा भरघोस कर्जपुरवठा करण्यात आला आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील साखर कारखानदारीसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या भरीव सहकार्याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे विशेष अभिनंदन करून आभार मानले.
देशभरात एनसीडीसीचे मजबूत जाळे!
देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनसीडीसीने भक्कम जाळे निर्माण केले आहे. याचा प्रत्यक्ष लाभ साखर उद्योगासह कृषी प्रक्रिया उद्योग, शेतकरी, दुग्ध उत्पादक, मत्स्यव्यवसाय, महिला बचत गट आणि ‘भारत टॅक्सी’सारख्या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नमूद केले.










