खासदार सुप्रिया सुळे यांनी घातले लक्ष; काम त्वरित थांबवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागणी
राजेंद्र झेंडे | महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा वाद आता पुन्हा एकदा चांगलाच ऐरणीवर आला आहे. हिंगणीगाडा येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ‘महादेव मळा पाझर तलावा’लगत एका खाजगी कंपनीच्या स्टोन क्रशरसाठी सुरू असलेल्या नियमबाह्य खोदकामाविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी थेट पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत हे काम तातडीने थांबवण्याची जोरदार मागणी केली आहे.
ग्रामस्थ विरुद्ध क्रशर चालक वाद चिघळला
मागील दीड वर्षांपासून दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा, वासुंदे आणि पाटस परिसरातील अनधिकृत स्टोन क्रशरबाबत स्थानिक ग्रामस्थ व क्रशर चालक यांच्यात तीव्र संघर्ष सुरू आहे. हिंगणीगाडा ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी ग्रामसभेची कोणतीही पूर्वपरवानगी अथवा ठराव न घेता परस्पर ‘ना हरकत दाखला’ (NOC) दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या मुद्द्यावरून यापूर्वी ग्रामसभाही वादळी ठरली होती.
ग्रामस्थांनी हे सर्व स्टोन क्रशर कायमस्वरूपी हद्दपार करण्याची मागणी करत प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, आर्थिक ताकद व राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे अनधिकृत क्रशर बिनदिक्कत सुरू ठेवण्यात आले आहेत, असा आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत. इतकेच नव्हे, तर जाब विचारणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
पाझर तलावाला मोठा धोका
महादेव मळा पाझर तलाव हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील असून, त्याची पाणीसाठा क्षमता सुमारे १४४.४३ दलघमी इतकी आहे. या तलावाच्या पाण्यावर परिसरातील सुमारे ३० हेक्टर बागायती शेती अवलंबून असून, वन्यजीव व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही हा प्रमुख स्रोत आहे.
परंतु, या तलावाच्या पूर रेषेपासून केवळ २७५ मीटर आणि मातीच्या भरावापासून अवघ्या ४५० मीटर अंतरावर स्टोन क्रशरसाठी धोकादायक खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा परिषद (लघुपाटबंधारे) उपविभाग, बारामती यांनी दौंड तहसीलदारांना पत्र लिहून धोक्याची पूर्वकल्पना दिली आहे. भविष्यातील स्फोट (ब्लास्टिंग) आणि खोदकामामुळे तलावाच्या भरावाला तडे जाऊन तलाव फुटण्याचा आणि परिसरातील शेती उद्ध्वस्त होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून त्यामध्ये पर्यावरण, शेती आणि वन्यजीवांचे अतोनात नुकसान करून कोणत्याही अनधिकृत किंवा नियमबाह्य कामांना परवानगी दिली जाऊ नये. जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने या प्रकरणाची त्वरित गंभीर दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी हे खोदकाम तातडीने थांबवावे. अशी मागणी केली आहे.
तालुक्याचे प्रशासकीय कारवाईकडे लक्ष
खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तक्षेप केल्याने या प्रकरणाला आता राजकीय व प्रशासकीय वजन प्राप्त झाले आहे. आता महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासन या वादग्रस्त स्टोन क्रशरवर काय कारवाई करते आणि हे काम रोखते का, याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.










