बारामतीच्या साहित्यिकाने मारली बाजी; सयाजीराजे गायकवाड साहित्य संमेलनात कथावाचन आणि वारकरी वेशभूषेतील सादरीकरणाला भरभरून दाद
रामभाऊ जगताप, बारामती
बारामती तालुक्यातील सांगवी येथील प्रसिद्ध कवी, कथालेखक व अभिनेते संजय बाबुराव मोरे यांच्या साहित्यसेवेचा झेंडा आता गुजरातमध्येही दिमाखात फडकला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने बडोदा (गुजरात) येथील ऐतिहासिक मध्यवर्ती ग्रंथालय, मांडवी येथे आयोजित पहिल्या ‘सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलना’त त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘रेडा म्हैस आणि मर्सिडीज’ या कथासंग्रहाची विशेष दखल घेण्यात आली असून, उपस्थितांनी त्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे हे ऐतिहासिक २०० वे मराठी साहित्य संमेलन होते. महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक नामवंत साहित्यिकांच्या उपस्थितीत २५ ऑक्टोबर २०२६ रोजी हा सोहळा उत्साहात पार पडला. या संमेलनाचे उद्घाटन परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष किशोर टिळेकर, कवी संमेलनाध्यक्ष सूर्यकांत नामगुडे, संजय मोरे, रमेश रेडेकर, मिलिंद बोडस, संजय बच्छाव, रंजनादेवी भोईटे, मानसी म्हसकर, संजय सोनार, सुधाकर भामरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कथावाचन आणि वारकरी वेशभूषेने वेधले लक्ष
परिस पब्लिकेशन (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या आणि अरविंद शेलार (कोपरगाव) यांनी आकर्षक मुखपृष्ठ सजवलेल्या ‘रेडा म्हैस आणि मर्सिडीज’ या २१ कथांचा समावेश असलेल्या वाचनीय कथासंग्रहातील शीर्षस्थ कथेचे अभिवाचन संजय मोरे यांनी संमेलनात केले. यासोबतच महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपत त्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सादर केलेल्या ‘वाट माझी पाहतोय विठोबा’ या काव्यमय गीत रचनेने संपूर्ण सभागृहाची मने जिंकली. त्यांच्या या सादरीकरणावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.
चित्रपट क्षेत्रातील अष्टपैलू योगदान
संजय मोरे हे केवळ साहित्यातच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतही आपल्या अष्टपैलू कार्यासाठी ओळखले जातात. त्यांनी दिलीप शिंदे यांच्या साथीने ‘माझ्या लग्नाचा बँडबाजा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन आणि नायक-खलनायक अशा बहुआयामी भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्या होत्या.
याशिवाय ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासमवेत ‘जाऊ तिथे खाऊ’ आणि ‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही विशेष गाजल्या आहेत. ग्रामीण भागातील एका प्रतिभावान साहित्यिकाने थेट गुजरातच्या भूमीवर आपल्या सशक्त लेखणीची आणि कलेची मोहोर उमटवल्याबद्दल बारामतीकरांनी मोरे यांचे कौतुक केले.










