अनिल आलुरकर, (उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, अमरावती)
लोकसभा किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ज्या उमेदवाराला प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक मतही जास्त मिळते, तो सरळ विजयी घोषित होतो. परंतु, विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यापेक्षा पूर्णपणे वेगळी, उत्कंठावर्धक आणि डोक्याला खुराक देणारी असते. इथे केवळ आघाडी मिळवून चालत नाही, तर विजयासाठी ठरवून दिलेला ‘विहित कोटा’ पूर्ण करणे अनिवार्य असते. एकल संक्रमणीय गुप्त मतदान पद्धतीवर आधारलेली ही मतमोजणी नेमकी कशी चालते आणि मतांचे हस्तांतरण कसे होते, हे एका साध्या उदाहरणावरून समजून घेऊया.
समजा, एका मतदारसंघात एकूण १०,००० वैध मते पडली आहेत. या पद्धतीत विजयाचा कोटा ठरवण्याचे एक निश्चित सूत्र असते—एकूण वैध मतांच्या पन्नास टक्क्यांपेक्षा एक मत जास्त. म्हणजेच, प्रस्तुत उदाहरणात ज्या उमेदवाराला विजयाची माळ गळ्यात घालायची असेल, त्याला किमान ५,००१ मते मिळवणे बंधनकारक ठरते. हा विजयाचा कोटा गाठल्याशिवाय कोणीही विजयी होऊ शकत नाही.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत केवळ ‘पसंती क्रमांक १’ ची मते मोजली जातात. चार उमेदवारांच्या रिंगणात पहिल्या फेरीअखेर उमेदवार ‘अ’ ला ४,००० मते, उमेदवार ‘ब’ ला ३,००० मते, उमेदवार ‘क’ ला २,००० मते आणि उमेदवार ‘ड’ ला १,००० मते मिळाली आहेत. येथे उमेदवार ‘अ’ सर्वाधिक ४,००० मते घेऊन आघाडीवर असला, तरी विजयाच्या ५,००१ च्या कोट्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत कोणाचाही विजय निश्चित होत नाही आणि प्रक्रिया दुसऱ्या फेरीत प्रवेश करते.
दुसऱ्या फेरीत सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला शर्यतीतून बाहेर (Eliminate) केले जाते. येथे उमेदवार ‘ड’ याला सर्वात कमी म्हणजे १,००० मते मिळाल्याने त्याला बाद ठरवले जाते. बाद झालेल्या उमेदवार ‘ड’ ची ही १,००० मते वाया जात नाहीत, तर त्या मतपत्रिकांवर मतदारांनी दिलेली दुसरी पसंती तपासली जाते. या छाननीमध्ये ६०० मतदारांची दुसरी पसंती उमेदवार ‘अ’ ला, ३०० मतदारांची दुसरी पसंती उमेदवार ‘ब’ ला आढळली, तर उर्वरित १०० मतपत्रिकांवर पुढील पसंती नसल्याने ती अवैध ठरली.
ही मते संबंधित उमेदवारांच्या खात्यात जोडल्यानंतर नवीन समीकरण समोर येते. उमेदवार ‘अ’ ची मते ४,००० वरून ४,६०० होतात, उमेदवार ‘ब’ चे पारडे ३,००० वरून ३,३०० वर पोहोचते, तर उमेदवार ‘क’ २,००० मतांवर जैसे थे राहतो. अजूनही कोणाकडेही आवश्यक असलेला ५,००१ मतांचा कोटा नसल्यामुळे मतमोजणी तिसऱ्या फेरीत जाते.
तिसऱ्या फेरीत पुन्हा सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. आता उर्वरित तिघांमध्ये उमेदवार ‘क’ कडे सर्वात कमी म्हणजे २,००० मते असल्याने तो बाद होतो. त्यानंतर उमेदवार ‘क’ च्या २,००० मतपत्रिका तपासून त्यावरील पुढील पसंतीक्रम मोजला जातो. या तपासणीत १,२०० मतदारांनी पुढील पसंती उमेदवार ‘अ’ ला, तर ५०० मतदारांनी उमेदवार ‘ब’ ला दिल्याचे स्पष्ट होते; तसेच ३०० मते पसंतीक्रम नसल्याने हस्तांतरित होत नाहीत. ही मते जमा झाल्यावर निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होते. उमेदवार ‘अ’ कडे ४,६०० अधिक १,२०० अशी मिळून तब्बल ५,८०० मते होतात, तर उमेदवार ‘ब’ कडे ३,३०० अधिक ५०० अशी ३,८०० मते जमा होतात. विजयासाठी आवश्यक असलेला ५,००१ चा कोटा उमेदवार ‘अ’ ने लीलया पार केल्यामुळे त्याला अधिकृतपणे विजयी घोषित केले जाते.
या आकडेवारीवरून हेच स्पष्ट होते की, पहिल्या फेरीत उमेदवार ‘अ’ कडे विजयासाठी १,००१ मते कमी असतानाही बाद झालेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या जोरावर त्याचा विजय सुकर झाला. शिक्षक किंवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ एका उमेदवाराला दिलेले मत निर्णायक ठरत नाही, तर मतदाराने नोंदवलेला प्रत्येक पसंतीक्रम विजयाची गणिते बदलू शकतो. त्यामुळेच ही मतमोजणी अत्यंत वेळखाऊ, क्लिष्ट आणि शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारी ठरते.











