बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतील अपक्ष उमेदवार डॉ. अनिल तुपे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनेलला आज पाठींबा जाहीर केला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू असून या निवडणूकीसाठी सत्ताधारी सहकार बचाव व राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनेलसह काही अपक्षांचेही अर्ज आहेत. यामध्ये डॉ. अनिल तुपे यांचीही उमेदवारी आहे. त्यांनी सांगवी या तिसऱ्या क्रमांकाच्या गटामध्ये उमेदवारी दाखल केली होती. आज त्यांनी आपला पाठींबा जाहीर केला. पवारसाहेब हे आमचे दैवत असून त्यांचे साखर उद्योगाबाबतचे योगदान व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तालुक्यातील सर्वांगिण विकासाबाबतचे काम यामुळे मी जाहीर पाठींबा देत असल्याचे डॉ. तुपे यांनी आज स्पष्ट केले.
आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे पाठींब्याचे पत्र दिले. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष किरण तावरे, रणजित धुमाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते.










