काका यादव, भवानीनगर
अडचणीत असलेल्या भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या ऊस दराची कोंडी फोडताना सभासद आणि गेटकेनधारकांना एकच दर जाहीर केला असून, तो पहिला हप्ता प्रतिटनी 3501 रुपये राहणार आहे. या कारखान्याने आणखी एक जाहीर केले आहे की, ज्या वजन काट्यावरून सभासदांचा ऊस घेतला जातो, त्याच वजन काट्यावर गेटकनधारकांचाही ऊस येतो आणि त्याच वजन काट्यावर साखरेचे देखील वजन होते, त्यामुळे आमचा वजन काटा चोख असून पैसे आमच्याकडून रोख घ्या अशा स्वरूपाची टॅग लाइन कारखान्याने तयार केली आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या अध्यक्षतेखाली आज संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांनी हा दर जाहीर केला. निंबाळकर यांनी सांगितले की, यावर्षीचा गळीत हंगामात्यंत अडचणीचा आहे. छत्रपती कारखान्यासाठी हा गळीत हंगाम देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर्षी बारा लाख टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट आहे. छत्रपती कारखान्याच्या सभासदांसह गेटकेनधारकांनीही छत्रपती कारखान्यालाच ऊस घालावा.
निंबाळकर म्हणाले की, छत्रपती कारखान्याचा हा पहिला हप्ता गेटकेन धारक आणि सभासदांना दोघांनाही एकसारखाच मिळणार आहे. याखेरीज कामगारांना देखील 15% बोनस जाहीर करण्यात आला असून, दिवाळीला आगाऊ हप्ता म्हणून 10% बोनस दिला जाणार असून संक्रातीच्या वेळी 5 टक्के बोनस दिला जाणार आहे. छत्रपती कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांच्या मदतीची अत्यंत गरज असून सभासदांनी कोणत्याही परिस्थितीत बाहेरील कोणत्याही कारखान्याला ऊस घालू नये.
छत्रपती कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे या कारखान्याचा वजन काटा अतिशय चोख आहे. त्यामुळेच आम्ही 1000 किलोचा एक टन असे गर्वाने म्हणतो. वजन काटा चोख आणि पैसे रोख असे आम्ही त्यामुळेच म्हणत असून आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली हे संचालक मंडळ सत्तेवर आले तेव्हापासून विश्वस्तांच्याच भूमिकेत हे काम करत असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन या संचालक मंडळाला आणि कारखान्याला मिळत आहे. त्यामुळेच आम्ही अडचणीतून कारखान्याला बाहेर काढण्याबरोबरच सभासदांनाही त्यांचा घामाचा दाम चांगला मिळाला पाहिजे, या हेतूने आम्ही हा दर जाहीर केला आहे.
यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष उपाध्यक्ष कैलास गावडे, ज्येष्ठ संचालक रामचंद्र निंबाळकर, गणपतराव कदम, माजी उपाध्यक्ष अशोक पाटील, विधीज्ञ शरद जामदार, पृथ्वीराज घोलप, अजित नरूटे, मंथन कांबळे, डॉ योगेश पाटील, निलेश टिळेकर, अनिल काटे, सतीश देवकाते, बाळासाहेब कोळेकर, सुचेता सपकळ, हनुमंत घोळवे, तानाजी शिंदे, संतोष मासाळ, विठ्ठलराव शिंगाडे, माधुरी राजपुरे, प्रशांत दराडे, सत्यवान चव्हाण, कार्यकारी संचालक अशोक जाधव आदी उपस्थित होते.










