चार हजारांहून अधिक विद्यार्थिनी व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; हत्तीपूजन, लेझीम पथक आणि पारंपरिक फेराने आणली रंगत
शारदानगर (बारामती) : भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा जपत, लोककला आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम घडवून आणणारा भव्य ‘महाभोंडला’ सोहळा शारदानगर येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविताताई व्होरा यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते हत्तीपूजन व आरती करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या महोत्सवामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतातील विविध पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) विद्यार्थिनी, महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक लेझीम पथक, ढोलवादन, पारंपरिक गाणी आणि महिलांनी धरलेला सामूहिक फेर यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
मान्यवरांची विशेष उपस्थिती व सत्कार
या सोहळ्याला पंढरपूर येथील प्रसिद्ध भारुडकार व राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या चंदाताई तिवाडी यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच जेजुरी येथील अर्चना क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेली ‘स्त्रीशक्ती’ या संकल्पनेवरील रांगोळी उपस्थितांचे आकर्षण ठरली. संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांच्या हस्ते या दोन्ही विशेष अतिथींचा सत्कार करण्यात आला.
४ हजारांहून अधिक महिलांचा सहभाग
या महोत्सवात बारामती पंचक्रोशीतील महिला व भगिनी मंडळे, बचत गट, विविध सामाजिक संस्था, पालक महिला, संकुलातील शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह तब्बल चार हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. नव्या पिढीला समृद्ध लोकपरंपरांची ओळख व्हावी, महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि सामूहिक सहभागातून सांस्कृतिक वारसा जतन व्हावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी पारंपरिक पद्धतीने खिरापतीचे वाटप करण्यात आले. सर्व घटकांच्या एकजुटीने व सहकार्याने हा महाभोंडला संस्मरणीय ठरला.











