बारामती : परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही भररस्त्यात एका व्यक्तीवर पिस्तूलमधून गोळीबार करत सत्तूरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुका हद्दीत घडली आहे. या हल्ल्यात श्री. राणा दिलीप सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले असून, बंदोबस्तातच घडलेल्या या थरारामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:१० वाजेच्या सुमारास पालखी महामार्गावरील विमानतळ रेल्वे ब्रिजच्या पुढे, पायलट ढाब्याजवळ ही घटना घडली. कटफळ बाजूकडून एका स्कूटीवरून दोन अनोळखी इसम आले. त्यापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने राणा सूर्यवंशी यांना बुके (पुष्पगुच्छ) देण्याचा बहाणा केला. सूर्यवंशी काही समजण्याच्या आतच त्या इसमाने स्वतःकडील पिस्तूलमधून त्यांच्या दिशेने थेट गोळी झाडली. गोळीबारानंतर हल्लेखोराने लोखंडी सत्तूरसदृश धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. या हल्ल्यात राणा सूर्यवंशी यांच्या उजव्या हाताच्या दंडावर आणि पोटाच्या उजव्या बाजूस दुखापत झाली. यानंतर दोन्ही हल्लेखोर स्कूटीवरून वेगाने पसार झाले.
पोलीस बंदोबस्तातच हल्ला झाल्याने खळबळ
विशेष म्हणजे ज्या वेळी हा हल्ला झाला, त्या वेळी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांचा ताफा आणि पहारा असतानाही हल्लेखोरांनी अत्यंत धाडसाने आणि निर्धास्तपणे हा गुन्हा घडवून आणला आणि ते पसार होण्यातही यशस्वी ठरले. यामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली असून नागरिकांमधून आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.
जखमींवर पुण्यात उपचार सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या राणा सूर्यवंशी यांना सुरुवातीला तातडीने ‘सिटी केअर हॉस्पिटल’ येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे हलविण्यात आले आहे.
दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
याप्रकरणी श्री. लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी (वय ४२, रा. जाचकवस्ती, सणसर, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ११८(१)(२), ११५(२), ३(५) आणि आर्म्स ॲक्ट कलम ४/२५, ३/२५, २७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार करत असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महिला पोलीस उपनिरीक्षक भगत यांनी पूर्ण केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.










