राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस हद्दीतील एका शेतजमीन खरेदी व्यवहारात खोटी कागदपत्रे सादर करून दुय्यम निबंधक कार्यालयाची दिशाभूल केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दस्त नोंदणी केल्याचा प्रकार समोर आला असून तो दस्त रद्द करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची लेखी मागणी निलेश शामराव शितोळे यांनी दुय्यम निबंधक श्रेणी-१, दौंड कार्यालयाकडे केली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी दस्त करण्याचे प्रकार वाढले आहेत. शिरापूर येथील ज्येष्ठ शेतकऱ्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता बनावट व्यक्ती उभी करून दस्त नोंदणी केल्याची तक्रार आधीच करण्यात आली होती. हा प्रकार ताजा असतानाच आता पाटस येथील ज्येष्ठ महिला शेतकऱ्याची दिशाभूल करत दस्त नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकारामुळे दौंड आणि केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील होणाऱ्या खरेदी दस्त नोंदणीवर शंका उपस्थित केली जात असून गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि एजंटच्या मदतीने हे प्रकार अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा परिसरात आहे.
यासंदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी पाटस हद्दीतील शेत जमीनीची खरेदी दस्त नोंदणीकृत झाला आहे. सदर गटाचे एकूण क्षेत्र ८७ आर असून, त्यापैकी ०.२९ आर क्षेत्राचा हा खरेदी दस्त आहे. ९० वर्षीय ज्येष्ठ महिला शेतकरी यांच्या वडिलोपार्जित शेतजमीन मधील काही चे दुय्यम निबंधक कार्यालयाची दिशाभूल करत फसवणूक करून दस्त नोंदणी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार, सदर दस्तात जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दस्तात लिहून देणार यांच्या नावात तफावत दाखवले आहे, मात्र. या एकच व्यक्ती असल्याचा कोणताही शासकीय पुरावा, राजपत्र किंवा प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे वेगळ्याच महिलेचे आधारकार्ड वापरून निबंधक कार्यालयाची दिशाभूल करण्यात आली आहे.
तसेच संबंधित लिहून देणार यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, त्यांच्या ९० वर्षांच्या वृद्धत्वाचा गैरफायदा घेऊन हा दस्त करण्यात आला. तसेच मुलाने केवळ संमतीचा अंगठा करून बोगस दस्तास सहकार्य केले आहे. दस्तासाठी सादर केलेला फेरफार हा दस्त नोंदणी झाल्यानंतर तब्बल २१ दिवसांनंतर नोंदणी कार्यालयात सादर करण्यात आला, ही अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे.
तसेच दस्त लिहून देणार यांचा संपर्क होत नसल्याचा गैरफायदा घेऊन दुसऱ्या महिलेला स्वतःची ओळख म्हणून सांगून अंगठा उमटवून जमीन विक्री केली असून आर्थिक फायद्यासाठी बोगस दस्त तयार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे सदर दस्ताची सखोल चौकशी करून तो तात्काळ रद्द करावा आणि संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदाराने दौंड दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालयात केली आहे. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहितीसाठी दौंड दुय्यम निबंधक कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.











