डॉ. सुजित अडसूळ यांना वैयक्तिक स्तरावर दोन बहुमान; पाचगणी येथे गौरव
बारामती : इंडियन सोसायटी ऑफ अॅनेस्थेशिऑलॉजिस्ट्सच्या (ISA) पाचगणी येथे संपन्न झालेल्या ‘सॅम्सकॉन २०२६’ (SAMSCON 2026) या राज्यस्तरीय परिषदेत ‘आयएसए बारामती’ (ISA Baramati) शाखेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परिषदेत बारामती भूलतज्ज्ञ संघटनेला उत्कृष्ट जनजागृतीसाठी (Best Public Awareness Award) संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला.
याच परिषदेत बारामतीचे डॉ. सुजित अडसूळ यांनी वैयक्तिक पातळीवरही चमकदार कामगिरी नोंदवली. त्यांना ‘बेस्ट रिव्ह्यूअर’ (Best Reviewer) विभागात राज्यात द्वितीय क्रमांक, तर ‘बेस्ट पब्लिक अवेअरनेस इंडिव्हिज्युअल’ या विभागात विशेष उल्लेखनीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पाचगणी येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र राज्य भूलतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोसले, उपाध्यक्ष डॉ. विकास कर्णे, सचिव डॉ. शितल दलाल यांच्यासह मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. सुजित अडसूळ व बारामतीच्या शिष्टमंडळाने हे पुरस्कार स्वीकारले.
मार्गदर्शक व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश
आयएसए बारामतीच्या या यशात संघटनेचे मार्गदर्शक डॉ. अशोक तांबे, डॉ. संजीव कोल्हटकर यांच्यासह सर्व ज्येष्ठ भूलतज्ज्ञ आणि सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. संघटनेच्या वतीने वर्षभरात विविध वैद्यकीय कार्यशाळा, जीवन संजीवनी क्रियेचे (CPR) प्रात्यक्षिक आणि तळागाळापर्यंत पोहोचलेली जनजागृती अभियाने सातत्याने राबवली जात आहेत. हे यश म्हणजे बारामतीच्या सामूहिक प्रयत्न, कामातील सातत्य आणि समाजाभिमुख आरोग्यजागृतीला मिळालेली राज्यस्तरीय पावती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
डॉ. अशोक तांबे (ज्येष्ठ मार्गदर्शक, आयएसए बारामती) : आयएसए बारामतीतर्फे सातत्याने सीपीआर, आरोग्यविषयक प्रबोधन आणि जनजागृतीचे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. आमच्या उपक्रमांची आणि त्यामागील सातत्यपूर्ण टीमवर्कची ही राज्यस्तरावर झालेली योग्य दखल आहे.











