कर्जाच्या आर्थिक अडचणीतून दुहेरी हत्याकांडाचा संशय? शेरेवाडी प्रकरणात मृत महिलांचा चुलत नातू पोलिसांच्या ताब्यात; तपासातून महत्त्वाचे धागेदोरे हाती
सचिन पवार, सुपे
बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील शेरेवाडी परिसरात दोन वृद्ध महिलांच्या झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, विकास राजेंद्र लडकत (वय २६) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ताब्यात घेण्यात आलेला विकास हा मृत महिलांचा चुलत नातू असल्याचे समजते.
घटनेनंतर सुरुवातीला चोरीच्या उद्देशाने बाहेरील व्यक्तीने हा गुन्हा केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पोलिसांच्या तपासादरम्यान संशयाची दिशा जवळच्या व्यक्तींकडे वळली. स्थानिक माहिती, तांत्रिक तपास आणि संशयिताच्या हालचालींच्या आधारे पोलिसांनी विकास लडकत याला ताब्यात घेतल्याचे समजते.
आर्थिक अडचणीचा तपासात धागा
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संशयितावर बँक तसेच फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली होती का आणि त्यातून पैशांची गरज भागविण्यासाठी चोरीचा प्रयत्न झाला का, या दिशेने पोलिस तपास करत असल्याचे समजते. मृत महिला आणि संशयित यांच्यात जवळचे नाते असल्याने घरातील परिस्थितीची माहिती संशयिताला असण्याची शक्यता तपासली जात आहे. मात्र, हत्येमागील नेमका उद्देश अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेला नाही.
झोपेत घात केल्याचा प्राथमिक संशय
दोन्ही महिला घरात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे तपासात पुढे येत आहे. त्या झोपेत असताना त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. घटनेनंतर शेरेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून विविध शक्यता तपासण्यास सुरुवात केली होती.
हत्यार व कपड्यांबाबत तपास
गुन्ह्यात वापरलेले हत्यार तसेच रक्ताचे डाग असलेले कपडे विहिरीत टाकल्याची माहिती तपासादरम्यान समोर आल्याचे समजते. संबंधित वस्तूंचा शोध घेण्याची तसेच त्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती आहे. तसेच चोरीला गेलेल्या सोन्याच्या वस्तूंबाबतही पोलिस तपास करत असून, काही मुद्देमाल मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्देमालाची अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
तांत्रिक तपासासह स्थानिक माहितीचा आधार
घटनास्थळाच्या परिसरात सीसीटीव्हीची उपलब्धता मर्यादित असल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. मात्र, सुपे पोलिसांनी स्थानिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताच्या हालचालींचा मागोवा घेतल्याचे समजते. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीतून हत्याकांडाबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे.
सुपे पोलिसांच्या पथकाची महत्त्वाची भूमिका
या प्रकरणाच्या तपासात सुपे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने काम केले. पोलिस शिपाई किसन ताडगे, महादेव साळुंखे, भाऊसाहेब चौधरी आणि पीयूष माळी यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती आहे. मर्यादित सीसीटीव्ही, सुरुवातीला उपलब्ध असलेले मर्यादित पुरावे आणि विविध शक्यता यामुळे तपास गुंतागुंतीचा होता. तरीही पोलिसांनी तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचल्याचे समजते.
अधिकृत खुलाशानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार
दरम्यान, संशयिताला न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. हत्येमागील नेमका उद्देश, चोरीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गुन्ह्याचे नियोजन आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पुढील तपास केला जाणार आहे. या प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी असून, पोलिसांच्या अधिकृत तपास व खुलाशानंतरच हत्येमागील नेमके कारण आणि संशयिताची भूमिका स्पष्ट होणार आहे.










