सोलापूर: ज्या वयात हातात लेखणी धरून भविष्याची स्वप्ने रंगवायची, त्याच वयात अंगावर शेतीची धुरा आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन झुंजणाऱ्या एका १८ वर्षीय कोवळ्या पोराने अखेर नियतीपुढे मान टेकली. दोन वर्षांपूर्वी बापाचे अचानक जाणे, दुष्काळामुळे आटलेली विहीर आणि पंधरा दिवसांपूर्वी सापाच्या दंशाने दगावलेल्या दोन जर्सी गायी… संकटांची ही मालिका सहन न झाल्याने बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील प्रथमेश अनिल खरात (वय १८) या तरुण शेतकऱ्याने सोमवारी रात्री स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आयुष्य संपवले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा सुन्न झाला असून गाव ढसाढसा रडत आहे.
दोन वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचा अंगावर बैलगाडी पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. संसाराचा डोलारा कोसळल्यानंतर १८ वर्षांच्या प्रथमेशने हिंमत न हारता शेतीची आणि घराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आई आणि लहान भावाचा तोच एकमेव आधार होता. मात्र, निसर्गाची वक्रदृष्टी त्याच्या पाचवीलाच पुजलेली होती. दुष्काळामुळे विहिरीचे पाणी आटले, पिकं करपली आणि संसाराचा गाडा हाकणे मुश्कील झाले.
या विवंचनेत असतानाच अवघ्या १५ दिवसांपूर्वी नियतीने आणखी एक क्रूर आघात केला; घराचा आधार असलेल्या दोन जर्सी गायींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. दुधाचा व्यवसाय बंद पडला, डोक्यावरचे कर्ज तसेच राहिले आणि डोळ्यांसमोर फक्त अंधार दिसू लागला. ‘आता जगायचं कसं आणि शेती करायची कशी?’ या विवंचनेने खचलेल्या प्रथमेशने सोमवारी रात्री ११:३० च्या सुमारास स्वतःच्या शेतातील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावून घेतला.
चुलते सुनील खरात यांनी तातडीने त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. बापानंतर घराचा कर्ता पोरगाही निघून गेल्याने आई आणि भावाचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. नियतीच्या क्रूर खेळाने एका कष्टाळू कुटुंबाचा आधार कायमचा हिरावून घेतला आहे. ‘प्रथमेश, तू लढायला हवे होतेस,’ अशी आर्त साद घालत उपस्थित प्रत्येक डोळा पाणावला होता. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली असून संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.











