किशोर भोईटे,महान्यूज लाईव्ह
साखर कारखानदारीचा प्रदीर्घ अभ्यास असणारे, शेतकऱ्यांच्या प्रपंचाची जाण असलेले, शिस्तप्रिय, पारदर्शी कामकाज करणारे आणि सभासदांना उसाचे पैसे वेळेत देण्यासाठी आग्रही असणारे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष व श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यावर विश्वास ठेवून यंदा इंदापूर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी तसेच निरा व भीमा नदीकाठचे ऊस उत्पादक छत्रपती कारखान्यास ऊस घालणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांनी दिली.
इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी यंदा प्रथमच इंदापूर येथे गेटकेन ऊस धारकांसाठी छत्रपती कारखान्याचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच इंदापूरचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या हस्ते करण्यात आले. श्री छत्रपती कारखान्याची सूत्रे पृथ्वीराज जाचक यांनी हाती घेतल्यापासून वेगवेगळे शेतकरी हिताचे निर्णय घेऊन पारदर्शीपणे कारखाना चालवणारे पृथ्वीराज जाचक यांच्या संकल्पनेतून यंदा गेटकेन ऊस धारकांसाठी इंदापूर येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
यावेळी इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती कारखान्याचा वजन काटा अचूक असल्याने तालुक्यातील गेटकेन ऊस उत्पादक यंदा या कारखान्यास ऊस घालणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक अॅड. शरद जामदार व आभार तानाजी शिंदे यांनी केले.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याने इंदापूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस छत्रपती कारखान्याला गाळपासाठी उपलब्ध होणार असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी इंदापूर येथे विभागीय कार्यालय सुरू केले आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर, संचालक संतोष मासाळ, पृथ्वीराज घोलप, निलेश टिळेकर, नगरसेवक प्रशांत उंबरे, अक्षय सूर्यवंशी, संचालक गणपतराव कदम, विठ्ठलराव शिंगाडे, सुचिता सपकळ, प्रशांत दराडे, मंथन कांबळे, दत्तात्रय राजपुरे, सतीश काटे, मुख्य शेती अधिकारी जालिंदर शिंदे, विष्णू यादव व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भरतशेठ शहा यांनी आपल्या भागातील ऊस हा सहकारी साखर कारखान्याला दिला पाहिजे व सहकार टिकला पाहिजे तसेच छत्रपती कारखान्याचा कारभार चोख असून पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे कामकाज उत्तम प्रकारे चालले आहे. ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांनी छत्रपतीकडे आपला ऊस घालावा असे आव्हान देखील केले.
शिवाजीराव निंबाळकर यांनी शेतकऱ्यांनी आपला ऊस कोणत्याही वजन काट्यावरती वजन करून खात्री करावी. छत्रपतीचा काटा हा चोख व एक हजार किलोचा टन असा आहे. ज्या काट्यावरून ऊस येतो, त्याच काट्यावरून साखर देखील वजन करून विक्री केली जाते. जो दर सभासदांना आहे तोच दर गेटकेन धारकांना असतो असे सांगितले. यावर शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करणार असल्याचे सांगितले व आमचा ऊस कायमस्वरूपी हा आपल्या छत्रपती कारखान्याला घेऊन जावे असे आवाहन देखील शेतकऱ्यांनी केले आहे.











