बारामती : शहरातील सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी बॅनर, पोस्टर्स आणि जाहिरात फलक लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. सुशोभीकरण केलेल्या जागेवर अनधिकृत फलक लावल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास बारामती शहरातील भिगवण चौक परिसरातील सर्व्हिस रोडलगत नगरपरिषदेने सुशोभित केलेल्या जागेवर विनापरवानगी जाहिरात फलक लावल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या आधारे बारामती शहर पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक अधिनियम, १९९५ च्या कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हादाखल करण्यात आला आहे.
दरम्यान शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक, शासकीय इमारती आणि इतर मालमत्तांवर बेकायदेशीररीत्या फ्लेक्स अथवा जाहिरात फलक लावल्यास यापुढेही थेट गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी तसेच जाहिरातदारांनी प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊनच फलक लावावेत, असे आवाहन बारामती शहर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.











