किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण विभागाची बोगस मान्यता घेऊन नोकरीला लागलेल्या अथवा मान्यता घेऊन शिक्षण झालेल्या शिक्षकांच्या मान्यतेची एसआयटी चौकशी करण्याचा ठराव काल शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचलित,श्री छत्रपती शिक्षण संस्थेची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा भवानीनगर येथे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात पार पडली. संस्थेचे एक ते आठ विषय साधक बाधक चर्चेने सर्वानुमते मंजूर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी प्रस्ताविक करून सभेस सुरुवात झाली.
वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यार्थ्यांची हजेरी, अनुपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता, मुलांची सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरे, शाळांमध्ये लोकवर्गणीतून भौतिक सुविधा, तसेच शिक्षकांनी पूर्ण क्षमतेने ज्ञानदानाचे काम केले पाहिजे. यासह वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयावर शंकरराव रुपनवर, वसंतराव जगताप, विक्रमसिंह निंबाळकर, भाजपाचे नेते तानाजी थोरात, राजाराम रायते, देवेंद्र बनकर , ऍड प्रशांत पवार, विशाल पाटील, रवींद्र टकले, सतीश काटे ,हेमंत निंबाळकर ,उमेश सपकळ, राजेंद्र सपकळ या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.
त्यावर संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी खुलासा केला. सर्वसाधारण सभेस श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर, माजी अध्यक्ष प्रशांत काटे, माजी उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्यासह सर्व विद्यमान संचालक, माजी संचालक, शिक्षक व सभासद उपस्थित होते.
शिक्षक मान्यतेची एसआयटी चौकशी होणार
शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये यापूर्वी काही शिक्षकांनी बोगस मान्यता घेतली आहे. त्यासाठी चुकीची कागदपत्रे जोडली आहेत. ज्येष्ठतेनुसार कार्यवाही झाली नाही. याविषयी अनेक सभासदांनी तक्रारी केल्या. यावर संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी एसआयटी चौकशी करायची का? असे सभेस विचारले असता सर्व सभासदांनी हात वर करून एसआयटी चौकशीस मान्यता दिल्याने असा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे आता बोगस नियुक्ती घेऊन नोकरीस आलेल्या शिक्षकांची खरी स्थिती समजणार आहे.











