उपेंद्र धोंडे, भूजलशास्रज्ञ
एखाद्या कामाला पुरस्कार मिळाला की त्याची स्वतंत्र वैज्ञानिक पडताळणी करण्याची गरजच उरली नाही, अशी मानसिकता धोकादायक आहे. पुरस्कार हा एखाद्या कार्याचा सन्मान असू शकतो; परंतु तो त्या व्यक्तीच्या भविष्यातील कोणत्याही जलदाव्यांचा वैज्ञानिक पुरावा ठरत नाही. आज जलतारा असो, शोषखड्डा असो, नदी पुनरुज्जीवन असो किंवा “दुष्काळमुक्ती”चा दावा, प्रत्येकासाठी वैज्ञानिक कसौटी स्पष्ट असलीच पाहिजे, जर आपण असे करत नसू तर आपण सपशेल जलनिरक्षरच.
कोणत्या प्रकारच्या संरचनेतून किती पाणी प्रत्यक्ष पुनर्भरण झाले? कोणत्या प्रकारे जलधरामध्ये गेले? भूजलपातळीत किती प्रमाणात आणि किती काळ, कसा बदल झालाय? पाण्याचा उपसा व जलसंतुलनाचे काय? परिणाम पावसामुळे की कृत्रिम हस्तक्षेपांमुळे? आणि हे परिणाम स्वतंत्र निरीक्षणातून पुन्हा सिद्ध करता येतात का? ही मोजमापे आणि पडताळणी करत नसतानाही मोठमोठे दावे करणे म्हणजे आपल्या खोट्या अनुभवांनाच विज्ञानाचा दर्जा देणे.
एखाद्या व्यक्तीचा सन्मान आणि त्याला मिळालेल्या पुरस्काराचा गौरव त्याच्या जागी; पण जलक्षेत्रातील अंतिम अधिकार पद, प्रसिद्धी वा पुरस्काराला नव्हे, तर मोजता येणाऱ्या वैज्ञानिक पुराव्यालाच असला पाहिजे. म्हणूनच प्रश्न एवढाच कि पुरस्कारांमुळे जलक्षेत्रातील दावे मोठे होणार, की वैज्ञानिक पुराव्यांमुळे?
यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो अशा त्या व्यवस्थेचा, जिथे पुरस्कार हेच कामाच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानले जाऊ लागतात आणि मग पुरस्काराचे हे गणित ज्यांना चांगलेच उमगले आहे ती माणसं कामापेक्षा प्रतिमा, प्रतिमेपेक्षा प्रसिद्धी आणि प्रसिद्धीपाठोपाठ पुरस्कार याचाच ध्यास धरतात.
पुरस्कारांचे गणित काहींनी इतके अचूक हेरले आहे की, आता कामापेक्षा त्याची प्रतिमा उभी करणे अधिक महत्त्वाचे ठरते आहे. आधी सामाजिक कामाचा गाजावाजा करा हि ईन्व्हेस्टमेंट, मग शासकीय व राजकीय पाठबळ (आजकाल धार्मिक देखील), मग प्रसारमाध्यमांना हाताशी धरून त्यातून प्रसिद्धी आणि यावर शेवटी पुरस्काराची मोहोर. एकदा का सरकारी पुरस्कार मिळाला की तोच मग पुढच्या सर्व अशास्त्रीय दाव्यांसाठी आणि प्रतिष्ठेसाठी भांडवल बनतो.
कामाची प्रसिद्धी → शासकीय पाठबळ → पुरस्कार → प्रतिष्ठा → पुढील दाव्यांना सहज मान्यता—ही साखळी तयार झाली की पुराव्यापेक्षा पुरस्कार मोठा होतो. मग जलतारा, शोषखड्डे, नदी पुनरुज्जीवन किंवा “दुष्काळमुक्ती”चे दावे किती वैज्ञानिक आहेत, यापेक्षा ते कोण मांडत आहे, पाठीशी कोण आहे, त्याला किती मिडिया कव्हरेज लाभतेय, कोणाला पुरस्कार मिळाला आहे हेच अधिक महत्त्वाचे ठरते.
आणि याचा सर्वात मोठा फटका जलक्षेत्राला बसतो. कारण खोट्या किंवा अतिशयोक्त यशाला पुरस्काराची मोहोर मिळाली की, तेच पुढे “मॉडेल” बनते आणि त्याची पुनरावृत्ती होते. परिणाम? पैसा खर्च होतो, संरचना उभ्या राहतात, प्रसिद्धी होते पण भूजलसुरक्षा, जलसंतुलन आणि सामान्य माणसाच्या पाण्याच्या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरितच राहते
हीच साखळी खरी धोकादायक आहे. मागील पंधरा वर्षे अशा पुरस्कारांच्या वजनाखाली वैज्ञानिक प्रश्न गाडले जाताना सर्रास आढळते आहे. शेवटी पुरस्कारांच्या मंचावर टाळ्या वाजवल्याने गावांची विहीरी भरत नाहीत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही, त्यांची कर्ज कमी होत नाहीत आणि पुढच्या पिढीला दुष्काळापासून संरक्षण लाभत नाही.
या पंधरा वर्षांतली पुरस्कारांची वाढती संख्या पहा, पण त्यानूसार पाण्याची शाश्वतता, शेतकऱ्याची सुरक्षितता आणि समाजाची जलनिर्भरता सुधारली? आणि तरीसुद्धा प्रश्न कामाच्या प्रसिद्धीचा नाही, आपण पुरस्काराला परिणामाचा पर्याय तर बनवलाय, हि घोडचूक आपल्या लक्षात येऊ नये? ईश्वर सद्बुद्धी देवो!











