आयुष क्षीरसागर ठरला उत्कृष्ट खेळाडू; नाशिकमधील स्पर्धेत १० संघांवर मात
बारामती : येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदानगर येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या मुलांच्या बास्केटबॉल संघाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून अजिंक्यपद मिळवले.
नाशिक येथील संदीप फाउंडेशन कृषी महाविद्यालयात पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील १० मातब्बर संघांनी सहभाग घेतला होता. बारामती कृषी महाविद्यालयाच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत आक्रमक आणि उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात बाजी मारली. संघातील आयुष क्षीरसागर याने लक्षवेधी खेळ करत स्पर्धेतील ‘उत्कृष्ट खेळाडू’चा बहुमान पटकावला.
विजेत्या संघात सचिन उसारे, आयुष क्षीरसागर, शुभम विजापूरे, दिग्विजय चव्हाण, वेदांत लुमदे, माधव शिंदे, ऋषी निंबोरे, विराज पाटील, अपूर्व नालवडे, विक्रम चौगुले, आदित्य पाटील व अमन जाधव यांचा समावेश होता. या संघाला क्रीडा शिक्षक प्रा. दत्तात्रय आदलिंगे आणि जय शिर्के यांचे मार्गदर्शन, तर प्रा. जे. के. क्षीरसागर यांचे संघ व्यवस्थापक म्हणून सहकार्य लाभले.
बक्षीस वितरण समारंभास राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. जे. बी. भाकरे आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते. या देदिप्यमान यशाबद्दल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, समन्वयक प्रा. ए. बी. रासकर, प्राचार्य डॉ. ए. डी. गोंडे, उपप्राचार्य एस. पी. गायकवाड तसेच प्राचार्या ए. डी. भोईटे यांनी खेळाडूंचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











