इंदापूर, डॉ. संदेश शहा : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले.

त्याचबरोबर प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर तसेच जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेत महाराष्ट्रात दमदार पाऊस पडावा, राज्य सुजलाम्-सुफलाम् व्हावे आणि दुष्काळाचे सावट दूर व्हावे, अशी प्रार्थना केली. मात्र गणेशदर्शनाच्या निमित्ताने झालेल्या या राजकीय भेटींमुळे इंदापूरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी फडणवीस आणि पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी तसेच राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. या भेटींमध्ये त्यांनी संबंधित नेत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण खात्याच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे आणि युवा नेते राजवर्धन पाटील उपस्थित होते.
मुंबईतील या भेटींकडे केवळ गणेशोत्सवाच्या शुभेच्छांची औपचारिकता म्हणून पाहायचे की त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांची काही पूर्वतयारी आहे, यावर इंदापूरमध्ये चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, इंदापूर तालुक्यातील राजकीय विरोधक मानले जाणारे भाजपचे नेते प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्यासमवेत हर्षवर्धन पाटील यांनी गारटकर यांच्या नवीन चारचाकी वाहनाचे सारथ्य केले होते. या घटनेनेही स्थानिक राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.
याचबरोबर इंदापूर तालुक्याचे माजी खासदार स्वर्गीय शंकरराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. एका बाजूला भाजपमधील नेत्यांशी संवाद, दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याशी असलेला संपर्क आणि आता मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे तसेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटी यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
हर्षवर्धन पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत. त्याचवेळी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमवेत ते विविध प्रसंगी एका व्यासपीठावरही दिसत आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय समीकरणात पाटील आणि भरणे यांच्यातील संबंधांकडेही इंदापूरच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. आगामी काळात स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलल्यास या दोन्ही नेत्यांच्या राजकीय भूमिकांचा त्यावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या या विविध राजकीय संपर्कांकडे आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. ते पुन्हा भाजपमध्ये जाणार की, काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार की मनसेसह अन्य राजकीय पर्यायांचा विचार करणार? याबाबत सध्या कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. मात्र विविध पक्षांतील प्रमुख नेत्यांशी त्यांचा सुरू असलेला संपर्क इंदापूरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील या भेटी केवळ सदिच्छा भेटी ठरणार की भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरणार, याकडे इंदापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.











