बारामती तालुक्यात गावपातळीवर देखील कोयता गॅंगचा मोठा धुमाकूळ पाहायला मिळाला. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावामध्ये सुद्धा अशीच एक भयानक घटना घडलेली आहे. भरदिवसा एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आलेले आहेत.
अमोल सदाशिव जाधव असे या तरुणाचे नाव असून काऱ्हाटी गावाच्या मुख्य चौकामध्ये हा हल्ला झालेला आहे. आरोपीने अमोल जाधव याच्या डोक्यावर तसेच हातावर आणि शरीराच्या इतर भागांवर कोयत्याने निर्घृण वार केले आहेत.
या हल्ल्यामध्ये अमोल जाधव गंभीर जखमी झालेला आहे. त्याला उपचारासाठी तात्काळ पुण्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. अमोल जाधव याची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेले आहे. ही भयानक घटना पूर्व वैमनस्यातून झालेली आहे असे समजण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळावर पोहोचले आहेत.
या हल्ल्यातील आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. काऱ्हाटी गावामधील ऋतिक आणि ओंकार अशी हल्ले पोरांची नावे समजली असून या दोघांनी गावच्या मुख्य चौकात अमोलला गाठून हा हल्ला केलेला आहे असे समजत आहे. या संदर्भात पोलीस ऋतिक आणि ओंकारचा शोध घेत आहेत. तसेच बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक सुद्धा गेले आहे.











