सचिन पवार, सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस सुपे घाटात दरीत कोसळून अपघात झाला. या अपघाताची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी हर्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, युगेंद्र पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
प्राथमिक माहितीनुसार, ही बस चौफुल्याकडून सुप्याच्या दिशेने जात असताना सुपे घाटातील एका ठिकाणी चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
दरम्यान, युगेंद्र पवार यांनी हर्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेत उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्यस्थितीचा आणि सुरू असलेल्या उपचारांचा आढावा घेतला.
जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत, उपचारादरम्यान कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी युगेंद्र पवार यांनी डॉक्टर तसेच रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली असून, जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











