मोरगाव, बारामती : पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस भरताना ‘सिगारेट ओढू नका’ असे सांगितल्याच्या कारणावरून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यास तिघांनी शिवीगाळ व दमदाटी करत हाताने मारहाण केली. त्यानंतर दारूच्या नशेत मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या तिघांविरोधात सुपा पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी एक बलेनो कार आणि लोखंडी कोयता असा सुमारे ५ लाख १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही घटना सोमवार (दि. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास मोरगाव येथील श्री मोरया पेट्रोलियम पेट्रोल पंपावर तसेच मोरगाव-जेजुरी मार्गावर घडली. याप्रकरणी पेट्रोल पंपावर काम करणारे भरत रंगनाथ मुरूकुटे (वय ३७, सध्या रा. मोरगाव) यांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनव भरत भामे (वय १९), रणजित रविंद्र भामे (वय २६) आणि केदार संजय भामे (वय २१, तिघेही रा. मावडी कडेपठार, ता. पुरंदर) हे सिल्व्हर रंगाच्या बलेनो कारमधून पेट्रोल पंपावर आले होते.
सीएनजी भरत असताना कारच्या बाहेर उतरून सिगारेट ओढत असताना फिर्यादीने ‘गॅस भरताना सिगारेट ओढू नका’, असे सांगितले. या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करत हाताने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी आरोपींनी दारूच्या नशेत मोठमोठ्याने आरडाओरडा करत सार्वजनिक शांततेचा भंग केला. त्यानंतर मोरगाव-जेजुरी रस्त्यावरही दंगा करून दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी कोयता आढळून आला. पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीची बलेनो कार आणि शंभर रुपये किमतीचा कोयता असा एकूण ५ लाख १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 352, 351(2)(3), 3(5), भारतीय शस्त्र कायदा कलम 4, 25(1B)(b) तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37/135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार लोंढे करीत आहेत.











