बारामती : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने इस्कॉन बारामतीच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव-२०२६ कृष्णाई लॉन्स येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्री श्री राधा गोविंद यांची आकर्षक सजावट, हरिनाम संकीर्तन, भजन-कीर्तन, अभिषेक सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्रीकृष्णकथेने संपूर्ण परिसर कृष्णमय झाला. या महोत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थित राहून श्रीकृष्णनामाचा आणि भक्तिरसाचा अनुभव घेतला.
यावेळी श्रीमान गौरांग प्रभुजी यांनी श्रीकृष्ण प्राकट्याचा आध्यात्मिक अर्थ उलगडून सांगितला. भगवंतांचे प्राकट्य ही केवळ ऐतिहासिक किंवा युगातील घटना नसून प्रत्येकाच्या अंतःकरणात आशा, प्रेम आणि भक्तीचा प्रकाश निर्माण करणारा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णनाम, कृष्णकथा आणि कृष्णप्रसाद यांच्या माध्यमातून मनातील अनर्थ दूर करून जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. जन्माष्टमी म्हणजे केवळ श्रीकृष्णांच्या जन्माचे स्मरण नसून अंतःकरणात भक्तीचा दीप प्रज्वलित करून श्रीकृष्णाशी नाते जोडण्याची संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महोत्सवानिमित्त श्री श्री राधा गोविंद यांना आकर्षक पोशाख व दागिन्यांनी सजविण्यात आले होते. विविध फुलांच्या हारांसह पर्यावरणपूरक हंस व कमळांची मनोहारी आरास करण्यात आली होती. तब्बल १५१ प्रकारचे भोग अर्पण करण्यात आले. दीपमाळा आणि श्रीकृष्णाच्या बाललीला व विविध प्रसंगांचे दर्शन घडविणारी सजावट यामुळे कृष्णाई लॉन्स परिसराला उत्सवी आणि आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले होते.
श्रीमान अखिल बंधू प्रभू व मंडळाच्या वतीने हरिनाम संकीर्तन आणि भजन-कीर्तन झाले. श्री श्री राधा-माधव यांचा भव्य कलश अभिषेक सोहळा पार पडला. मंदिर व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक श्रीमान नंद दुलाल प्रभू, सदस्य डॉ. महेश काटे, श्री शरद भोसले, श्री योगेश सुभेदार, ॲड. सुनील पाटील आणि श्री संजीव देशपांडे यांच्या हस्ते श्रीमान गौरांग प्रभू यांचे स्वागत करण्यात आले.
इस्कॉन गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सभासद, बी.टेक. आयआयटी मुंबईचे श्रीमान गौरांग प्रभू यांनी श्रीकृष्णकथेच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी इस्कॉन बारामतीच्या प्रस्तावित वास्तूची थ्रीडी दृश्य कल्पना व दृश्यफेरीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध उपक्रमांची माहिती देत औपचारिक वर्च्युअल उद्घाटन करण्यात आले.
महोत्सवात सौ. अनुराधा आहेर व सौ. विद्या पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली ‘विष्णू स्तुती-गरुड गमन नृत्य’ आणि ‘श्री नृसिंह आरती’ या नृत्यांचे सादरीकरण झाले. श्री संजीवनाना देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘जेव्हा भगवंत साक्ष देतात’ या साक्षी गोपाल यांच्या कथानकावर आधारित भावपूर्ण नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली. श्रीमान नंद दुलाल प्रभुजी यांनी इस्कॉनच्या प्रस्तावित वास्तुरचनेची पार्श्वभूमी आणि उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री श्री राधा गोविंद यांची महाआरती करण्यात आली.
या सोहळ्याला बारामतीतील ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते श्री किरण गुजर, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, IPS, नेचर डिलाईट डेअरी अँड डेअरी प्रॉडक्ट प्रा. लि.चे चीफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. जय देसाई, भारत फोर्ज लिमिटेडचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री संजय अग्रवाल, नगरसेविका सौ. कमल हिंगणे, गुणवडीचे लोकप्रतिनिधी श्री भारत गावडे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सुमारे २०० मान्यवरांच्या हस्ते कलश अभिषेक करण्यात आला.
बाल गोपाल, युवक आणि महिला भक्तांच्या सहभागामुळे महोत्सवाला विशेष रंगत आली. विविध स्टॉल्स, सेल्फी पॉईंट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे भाविकांना भक्तीचा उत्सव जवळून अनुभवता आला. इस्कॉनच्या विविध सेवाभावी समित्या, युवक, महिला, बाल गोपाल, भक्तगण आणि स्वयंसेवकांनी महोत्सवाचे यशस्वी नियोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलिमा पेंढारकर आणि श्री बाबासाहेब खेडकर यांनी केले. दत्ता माने मीडिया सर्विसेसच्या माध्यमातून छायांकन व दृकश्राव्य सेवा देण्यात आली, तर श्री निलेश पाटील, AI Film Maker and Business Management, Epic Company, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले.
भक्ती, अध्यात्म, संगीत, संस्कृती आणि सामाजिक सहभागाचा संगम ठरलेल्या या महामहोत्सवाची सांगता सर्वांसाठी आयोजित प्रीती भोजनाने झाली. श्रीकृष्णाशी नाते जोडणे, कुटुंबांना एकत्र आणणे, युवकांना सकारात्मक दिशा देणे तसेच प्रेम, करुणा आणि सद्भावनेचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उत्सव आयोजित करण्यात आल्याचे इस्कॉन बारामती मंदिर व्यवस्थापक श्रीमान नंद दुलाल प्रभुजी यांनी सांगितले.











